आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात सद्यपरिस्थितीत उद्योगांना पोषक वातावरण उपलब्ध होत नाही. जातीय व धार्मिक ध्रुवीकरण वाढल्याने तसेच राजकीय धोरणांच्या अस्थिरतेचा सर्वाधिक फटका उद्योगांना बसला असून देशातून तब्बल २७०० विदेशी कंपन्यांनी भारतातून आपला गाशा गुंडाळला आहे. नवीन उद्योग येत नाही. आहे ते उद्योग भारताबाहेर जात असल्याने देशात बेरोजगारीनेही उच्चांक गाठला आहे. त्यामुळे देशातील सद्यस्थितीचा फटका उद्योग क्षेत्राला बसल्याने रोजगार निर्मितीवर मोठा परिणाम झाल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. देशात महागाई वाढत असल्याने श्रीलंका व पाकिस्तान या देशांसारखी परिस्थिती उद्भवू शकते, त्यामुळे सरकारने योग्य ती पावले उचलावीत असेही ते म्हणाले. पद्मश्री कर्मवीर काकासाहेब वाघ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ के. के. वाघ शिक्षण संस्थेतर्फे शुक्रवार (दि. ३) जून रोजी गंगापूर रोडवरील कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय शिक्षण पद्धतीसमोरील भविष्यातील आव्हाने’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. माजी खासदार प्रतापराव वाघ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी मुख्यमंत्री चव्हाण यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा सहज, साध्या, सोप्या शब्दांत मांडला. ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था २.७ ट्रिलियन डॉलर इतकी आहे. मार्च २०२३ ही अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर इतकी करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु, सद्यस्थितीचा ञ विकासदर बघता हे शक्य होणार नाही. त्यामुळे केंद्र सरकारने आता ५ ट्रिलियनची अर्थव्यवस्थेचा मुद्दा सोडून दिला आहे. १३० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोक शेती क्षेत्रात काम करतात. ‘जीडीपी’मध्ये त्यांचा वाटा १६ टक्के आहे तर, सेवा क्षेत्राचा ५४ टक्के आणि उर्वरित उद्योगांचा वाटा आहे. देशाचा ‘जीडीपी’ सातत्याने घसरत असल्याने दरडोई दरमानसी उत्पन्नात जगात भारताचा १४२ वा क्रमांक लागतो. जो बांगलादेशापेक्षाही खाली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ, सचिव के. एस. बंदी, अजिंक्य वाघ आदी उपस्थित होते. व्याख्यानास नागरिक तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.