आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Due To The Height Of The Clouds, The Rain Is Pouring, The Clouds Are Not Forming At Six And A Half Thousand Feet, The Monsoon Rains Hit The State!

ढगांच्या उंचीमुळे पाऊस ठेंगणा:साडेसहा हजार फुटांवर ढगांची निर्मिती होत नसल्याने राज्यात मोसमी पावसाने मारली दडी!

नाशिक । सचिन वाघ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात विदर्भ वगळता सर्वत्र मान्सून दाखल झाला आहे, परंतु, काही ठिकाणचा अपवाद वगळता सर्वत्र त्याने दडी मारली आहे. समुद्रसपाटीपासून साडेसहा हजार फूट उंचीपर्यंत असलेल्या स्ट्रॅटस, स्ट्रॅटोक्युमूलस, क्ल्युमूलस आणि क्युमूलोनिंबस या प्रकारातील ढगांची निर्मिती होत नसल्याने तसेच अनुकूल वातावरणाचा अभाव असल्याने अशी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. दरम्यान, बुधवारीही मराठवाड्यासह पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात कडक ऊन होते.

महाराष्ट्रात मान्सून ११ जून रोजी दाखल झाला असला तरी अनुकूल वातावरण नसल्याने राज्यात तुरळक ठिकाणीच पाऊस होत आहे. खरिपाची तयारी केलेल्या शेतकऱ्यांच्या पेरण्या त्यामुळे रखडल्या आहेत. नैर्ऋत्य मोसमी वारे बुधवारी मराठवाड्याच्या आणखी काही भागात पुढे सरकले आहेत. संपूर्ण कर्नाटक, रायलसीमा, तामिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारी परिसरात मान्सूनची प्रगती झाली आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात मान्सून दाखल झाला आहे. परंतु, पाऊस पडत नसल्याने शेतीचे नियोजन बिघडण्याची भीती असून कमी अवधीमध्ये येणाऱ्या पिकांना शेतकऱ्यांकडून प्राधान्य मिळण्याची शक्यता असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.

ढगांचे एकूण प्रकार १० तर या ढगांचे शास्त्रीय दृष्टीने तीन पातळ्यांत केले जाते वर्गीकरण, यातील क्युमूलोनिंबस ढग प्रकारच बरसतो​​​​​​​

मध्यम ढग : ६५०० ते २०००० फुटापर्यंत असतात.

अल्टोकुमूलस : करड्या- पांढऱ्या थरात, गोलाकार, घनदाट ठशाचे, चांगल्या व आल्हाददायक वातावरणात असतात.

अल्टोस्ट्रॅट‌्स : करड्या निळसर थरातील, कधी पूर्ण आकाश व्यापलेले व कधी सूर्याभोवती फिंगारलेल्या स्थितीत दिसतात. संततधार झडीचा पाऊस असतो. पाऊस व पर्वतीय भागात बर्फवृष्टी करतात.

निंबोस्ट्रॅटस : गडद करडे, आकारहिन, बर्फ व स्फटिकांनी भरलेले यांचे थर असतात. नेहमी सूर्याला झाकतात व सतत पाऊस व बर्फ ओततात.

निम्न ढग : ६५०० फुटांपर्यंत. त्यातही ४ प्रकार आहेत

स्ट्रॅटस : करडे पांढरे पातळ शीट पसरल्यासारखे. कधी सर्व आकाश व्यापतात तर कधी जमिनीवरही उतरतात. यामुळे हलका पाऊस पडतो.

स्ट्रॅटोक्युमुलस : गडद पण गोलाकार, सुरुवातीला शांत वातावरण दाखवणारे पण पाठीमागून वादळी पाऊस घेऊन येतात.

क्युमूलस : पांढरे अस्ताव्यस्त. खालून सपाट वरून कापसाच्या गंजीसारखे असणारे पण नंतरच्या १-२ दिवसांत चांगले पाऊस देतात.

क्युमूलोनिंबस : भव्य काळे मनोरा व नागासारखे उभे ठाकलेले. शेंड्यावर फण्यासारखे. विस्कटलेले. उष्ण व आर्द्रतायुक्त. विजांच्या गडगडाटासह मोठ्या थेंबाचा पाऊस देतात.

उच्च ढग : २०००० फुटांच्या वर असलेले
सिरस : पक्ष्याच्या पांढऱ्या पंखासारखे असून त्यात स्फटिकासारखा बर्फ असतो.

सिर्रोकुमूलस : पांढरे पातळ कापसाच्या बँडेजसारखे. उष्ण कटिबंधातील अटलांटिक महासागरातील चक्रीवादळात हे थंड व ताकतवर असतात.

सिर्रोस्ट्रॅटस : पूर्ण आकाशात पसरलेले असतात, हिवाळ्यात कधी २४ तासांत पाऊस किंवा बर्फ पाडतात.

बातम्या आणखी आहेत...