आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर महाराष्ट्राचे संपर्कनेता व प्रर्दीघ काळापासून नाशिकची जबाबदारी सांभाळणारे खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धोक्यात आलेल्या शिवसेनेच्या 'शंभर प्लस' योजनेला राऊत यांच्या सुटकेमुळे पुन्हा उभारी निर्माण होण्याची आशा व्यक्त होत आहे. एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गडाकडे जाणारे संभाव्य माजी नगरसेवकांचे आऊटगोइंगही थांबेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
राऊत - नाशिक समीकरण
गेल्या काही वर्षात नाशिक शिवसेना व राऊत हे समीकरण झाले आहे. यापुर्वी नाशिकचा कारभार हा संपर्कप्रमुखाच्या नेतृत्वाखाली चालत हाेता. मात्र, काही वर्षापुर्वी प्रथमच उत्तर महाराष्ट्र संपर्कनेतेपद तयार करून राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपर्कप्रमुख नेमले गेले. राऊत यांनी मात्र स्वत:कडे सूत्रे घेत नाशिकची बांधणी केली हाेती. एवढेच नव्हे तर त्यांनी गटबाजी कमी करत नवीन व जुन्या पदाधिकाऱ्यांचा मेळ साधला.
घरवापसीचे प्रयत्न होणार
दाेन वर्षापुर्वी नगरसेवकामधून महानगरप्रमुख म्हणून ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करून विस्तार सुरू केला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्याचे बघून भाजपला सुरूंग लावत माजी आमदार वसंत गिते व सुनील बागुल यांची घरवापसी केली हाेती. राज्यातील सत्तांतर हाेण्यापूर्वी भाजपाचे किमान 15 ते 20 नगरसेवकांना शिवसेनेत आणण्याची राऊत यांची तयारी हाेती. आताही शिवसेनेतून गेलेल्यांच्या घरवापसीचे प्रयत्न होणार हे दिसते.
दावा प्रत्यक्षात खरा ठरणार का?
महापालिकेत शिवसेनेचे 35 नगरसेवक गेल्या पंचवार्षिक मध्ये होते. या सर्वांचा हिशोब करून नाशिकमधील आगामी पालिका निवडणुकीत शंभर प्लसचा नारा दिला हाेता. मात्र आता त्यांच्या अटकेनंतर हा दावा प्रत्यक्षात उतरणार का हा पेच होता. यापूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख तसेच नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतरही प्रदीर्घ काळ सुटका झाली नाही. राऊत यांच्या बाबत तसे झाल्यास महापालिका निवडणुकीत शिवसेना अडचणीत येईल अशी अटकळ व्यक्त होत होती. मात्र राऊत यांची सुटका झाल्यामुळे शिवसेनेच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जिल्हा परिषदेत समीकरण बदलणार
जिल्हा परिषदेत शिवसेनेची पाच वर्षापासून सत्ता आहे. जि.प. च्या 73 जागापैकी 26 जागा शिवसेनेकडे आहे. त्याखालाेखाल राष्ट्रवादी, भाजप, काॅंग्रेस व माकप किंबहुना अपक्ष पक्ष आहेत. माजी मंत्री दादा भुसे व आमदार सुहास कांदे यांच्यामुळे सेनेला ग्रामीण भागात फटका बसला हाेता. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे गटातील स्थानिक नेत्यांच्या कुरघोडीचे राजकारण बघता ग्रामीण भागात विशेष करून नाराजीचे वातावरण असल्यामुळे आता शिवसेनेला राऊत यांच्या नेतृत्वाखाली पुनर्भरारी घेण्याची संधी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.