आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सरला’ झाली दुर्गा:तरुणाच्या खुन्याचा पाठलाग करत केले जेरबंद, पोलिस आयुक्तांनी केले महिला पोलिसाचे कौतुक

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चार दिवसांपूर्वी कामगारनगर येथील पवन नथू पगारे आणि त्याचा मित्र अजय अर्जुन सिंग यांच्या किरकोळ वाद झाला होता. त्याचे रूपांतर हाणामारीत होऊन अजय सिंगने पवनवर चाकूने वार करत निर्घृण खून केला. हा प्रकार बुधवारी (दि. १) सकाळी साडेनऊ वाजता पाइपलाइनरोडजवळ कॅनॉलरोडलगत घडला. त्याचवेळी ध्रुवनगरकडून गंगापूर पोलिस ठाण्यात कर्तव्यावर जात असलेल्या महिला पोलिस सरला विजय खैरनार यांनी पळून जात असलेल्या अजय सिंगचा पाठलाग करून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. हा थरार खैरनार यांच्याच शब्दांत...

पोलिस दलात दाखल होऊन बरोबर आजच १० वर्षे झाली. त्यामुळे एका वेगळ्याच आनंदात, विचारात गंगापूर पोलिस ठाण्यात जाण्यासाठी सकाळी ९.३० वाजता धृवनगरच्या माझ्या घराकडून कॅनॉलराेडवरुन दुचाकीवर निघाले होते. कॅनाल रोडवरच्या मध्यावर पाण्याच्या टाकीजवळ बळवंतनगरच्या कोपऱ्यावर नागरिकांचा घाेळका दिसला. ते बघत नाही तोच समोरून आपल्याच दिशेने हातात रक्ताने माखलेला धारदार चाकू व अंगावर रक्ताचे डाग असलेला युवक पळत होता. दोघेजण त्याचा पाठलागही करत होते. सुरूवातीला काहीतरी लुटीचा प्रकार वाटला मात्र संशयित युवक पळत-पळत शंभर मीटरपर्यंत आल्यावर गाडी बाजूला थांबवून त्याला जोरात ओरडून थांबण्यास सांगितले. मी खाकी वर्दीत असल्याचे बघून त्याने धावण्याचा वेग वाढवला. मीदेखील त्याचा पाठलाग केला. तो जवळच असलेल्या दाट झाडी-झुडपांमध्ये गुडूप होण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात मी त्याची मागून कॉलर पकडली. पहिल्यांदा हातातील चाकू खाली टाक, तू जर पळाला तर तूझे खरे नाही, म्हणत दामटवाले. त्याने घाबरुन चाकू खाली टाकला अन‌् त्याला शिताफिने ताब्यात घेतले. त्याने थोडे हात झटकत पुन्हा हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला. मी संशयितास पकडल्याचे बघून गर्दीतील काही तरुण माझ्या दिशेने आल्याने संशयितही जागीच थांबला. त्याला खाली पाडून त्याचे हात धरीत लागलीच पोलिस ठाण्यात कॉल केल्याने दहा मिनीटात गंगापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला ताब्यात घेतले. त्याला खाकीचा धाक दाखविताच त्याने स्वत:चे नाव अजय अर्जून सिंग असल्याचे सांगितले. मित्र पवन पगारेचा खून केल्याची कबुली दिली.

बातम्या आणखी आहेत...