आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“दीवार’ या चित्रपटांमध्ये ज्या पद्धतीने अमिताभ बच्चन यांच्या हातावर “मेरा बाप चोर है’ असे लिहिले होते तसेच ‘मेरा बाप गद्दार है’ असे राज्यातील लाेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेलेल्या चाळीस आमदार व बारा खासदारांची मुलेबाळे, नातेवाइकांकडे बघून म्हणतील. येणाऱ्या अनेक पिढ्यांच्या भाळी हा शिक्का असेल. त्यांना शांतपणे जगू देणार नाही, अशी गंभीर व शिवराळ भाषेतील टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिक येथे केली. हिंमत असेल तर निवडणुका घ्या, एकही गद्दार पुन्हा निवडून येणार नाही असे आव्हानही त्यांनी दिले.
ईडी प्रकरणामुळे तुरुंगात गेलेले राऊत यांची सुटका झाल्यानंतर प्रथमच नाशिकमध्ये त्यांचा दौरा झाला. या वेळी पत्रकार परिषदमध्ये त्यांनी शिंदे गटावर टीकेची जोड उठवली. ते पुढे म्हणाले की, बारा खासदार, ४० आमदार गेल्यानंतर काय होणार अशी चिंता व्यक्त होत होती. मात्र संघटना ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिली. लोकांमध्ये या कृत्यामुळे प्रचंड संतापाचे वातावरण असून गद्दारांची पळती भुई थोडी झाली आहे. वैजापूर तालुक्यामध्ये त्याची प्रचितीही घेतली. कुठेही लग्नात गेले, समारंभात गेले की गावातील लोक हे ‘खोकेवाले आले’ असे म्हणत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका याच भीतीपोटी पुढे ढकलल्या जात असून शिवसेना कोणत्याही चिन्हाखाली निवडणूक लढवेल व विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यापुढे किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडी कायम राहील. देशातील हुकूमशाही संपवायची असेल, देशाचे वातावरण चांगले ठेवायचे असेल तर अशा पद्धतीच्या तडजोडी कराव्या लागतात. भिन्न विचाराच्या लोकांना एकत्र घ्यावे लागते. १९७८ मध्ये जनता सरकारने असाच प्रयोग केला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले. जुन्या केसेसचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांवर कारवाई होत आहे. तडीपारी केली जात आहे. हे खालच्या स्तरावरील राजकारण आहे.ईडी तुरुंगातून लवकर सुटका झाल्याबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, मी स्वतः जीवाची बाजी लावून लढलो. तुरुंगात गेलो. मलाही गुडघे टेकता आले असते. पक्षाचा त्याग करून माझी कातडी वाचवता आली असती. त्यांना कोर्टाने फटकारले. अनिल देशमुख, नवाब मलीक हे अजून बाहेर आले नाही याबाबत विचारले असता, ते म्हणाले की दोघांना खरे तर जामीन मिळायला हवा होता. जामीन हा त्यांचा अधिकार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावर संभाजी ब्रिगेडने केलेल्या टीकेला भास्कर जाधव यांनी उत्तर दिले आहे मी आधी बोलणार नाही, असेही राऊत यांनी या वेळी बोलताना सांगितले.
सीमाप्रश्नावर महाराष्ट्र सरकारने जलसमाधी घ्यावी सीमाप्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री तुम्हाला सरळ डिवचत आहेत. तुमच्या तोंडावर थुंकत आहेत. मात्र कर्नाटकाने सोडलेल्या पाण्यात महाराष्ट्र सरकारने जलसमाधी घेतल्याचे दुर्दैवी चित्र आहे. स्वाभिमानाच्या मुद्द्यावर शिंदे गटाने शिवसेना सोडली. यांच्या क्रांतीची आता वांती झाली आहे का? महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा रोज अवमान होत आहे, मात्र यांच्या तोंडातून शब्द निघत नाहीत. गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या भाषेत टीका झाल्यानंतर त्या मुद्द्यावर तेथे निवडणूक लढली जात आहे, मात्र महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होऊन सत्ताधारी थंड आहेत. या अवमानाचा बदला लवकरच शिवसेना घेईल असा दावा राऊत यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.