आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पंधरा दिवसांत खाद्यतेल 5 ते 45 रुपयांनी स्वस्त; येत्या काळात आणखी स्वस्त होण्याची शक्यता

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

खाद्यतेलाचे दर प्रचंड प्रमाणावर महागल्यानंतर केंद्र सरकारने आयात कर व कृषी सेस शून्य टक्के केला होता, या मोठ्या सवलतीचा परिणाम प्रत्यक्ष बाजारात दिसू लागला आहे. केवळ पंधराच दिवसांत खाद्यतेलाचे दर किरकोळ बाजारात लिटरमागे ५ ते ४५ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, इंडोनेशियातून नियमित झालेली पामतेलाची आयात आणि देशात मान्सूनचे आगमन, त्यामुळे चांगले तेलबियांचे पीक हाती येण्याची सुचिन्हे व खाद्यतेलाची कमी झालेली मागणी याचा एकत्रित परिणाम स्वरूप येत्या काळात हे दर आणखी स्वस्त होतील.

भारत सूर्यफुलाचे तेल रशिया, युक्रेन व अर्जेंटिना या तीन देशांतून तर पामतेलाची आयात इंडोनेशिया व मलेशियातून मोठ्या प्रमाणावर करतो. मार्च महिन्यात रशिया व युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्याने सूर्यफुल तेलाची आयात ठप्प झाली ती अजूनही प्रभावित आहे. दुसरीकडे लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात पामची फळे झाडावरच वाया गेली, यामुळे तेथे खाद्यतेलाचे संकट निर्माण झाले व या देशाने पामतेलाची निर्यात बंद केली होती. याचा परिणाम भारतात अगोदरच महागत असलेल्या खाद्यतेलाच्या दरांचा भडका उडाला होता. मात्र, अर्जेटिनाकडून सूर्यफुल तेलाची आयात सुरू झाली आणि इंडोनेशियाने निर्यातबंदी उठवली तर भारत सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील आयात शुल्क पूर्णपणे माफ केल्याने मोठ्या आयातकांना प्रोत्साहन मिळाले. तर इकडे पावसाळा सुरू झाल्याने भारतीय बाजारात खाद्यतेलाची मागणी कमी झाल्याने सर्वच खाद्यतेलाचे दर स्वस्त झाले असून ते अजून स्वस्त होणार आहेत.

अजून स्वस्त होण्याची शक्यता
केंद्र सरकारने आयात कर व कृषी सेस रद्द केल्याचा प्रत्यक्ष परिणाम बाजारात आता दिसू लागला असून सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे वाढलेली आयात, मान्सूनचे वेळेवर आगमन व कमी झालेली मागणी यामुळे तेलाचे हे दर अजून कमी होण्याची शक्यता आहे.
- परेश बोघाणी, खाद्यतेल ब्रोकर