आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील आदिवासी पट्टा अन् दुष्काळी तालुक्यांमध्ये लोकसहभागातून पाणी साठवण क्षमता ‘फेरोसिमेंट’ तंत्रज्ञानातून वाढविण्यासाठी भगीरथ प्रयत्न होत आहे. पाणीटंचाईच्या काळात ही पद्धत तहान भागविणारी ठरू शकते. बहुपयोगी अशा या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक मंगळवारी (दि. १०) अश्विननगर येथे इंजिनिअर उल्हास परांजपे आणि विजय खरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे करण्यात आले. जास्त प्रमाणात हा प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले आहे.
जलवर्धिनी प्रतिष्ठान, मुंबई आणि कार्डियन करेक्ट इंटरनॅशनल फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने अल्प खर्चात ग्रामीण भागात उपलब्ध मनुष्यबळ वलोकसहभागातून पाणी साठवण क्षमता वाढविली जाऊ शकते. यासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणे महत्त्वाचे आहे. त्याच अनुषंगाने अश्विननगर येथील एका बंगल्याच्या गच्चीवर १५०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकी जाळीच्या सहाय्याने उभारण्यात आली आहे.
मनरेगाच्या माध्यमातून या संदर्भात शासन निर्णय क्रमांक २०२१०५२०१२५९२८०२२ निर्गमित होऊनही त्याला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे या विषयाच्या जनजागृतीसाठी कार्डियन करेक्ट स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला असून संस्थेचे नितीन गायकर, रोशन बधान यांनी ग्रामस्थांना या विषयाची सुलभता लक्षात यावी यासाठी जलवर्धिनी प्रतिष्ठानला विनंती केली होती.
प्रतिष्ठानने गेल्या वर्षी सुरगाणा येथे गुरुजी रुग्णालय सेवा प्रकल्पासाठी हा उपक्रम राबविला होता. साधारण अडीच ते तीन रुपये प्रति लिटर खर्चात शंभर वर्षे टिकेल अशी पाण्याची टाकी १ हजार ते ३० हजार लिटरपर्यंत लोकसहभागातून होऊ शकते, असे जलवर्धिनी प्रतिष्ठानचे तांत्रिक सहायक विजय खरे यांनी सांगितले.
नारळाच्या काथ्या, अंबाडी, केळीचे धागे या वस्तूंचा वापर
विविध कंपन्यांनी सामाजिक सेवा दायित्व अर्थात सीएसआरच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाई व नंदुरबार येथे उपक्रम प्रतिष्ठानने राबविला आहे. जमिनीखालील आणि जमिनीवरील पाण्याच्या टाक्या नारळाच्या काथ्या, अंबाडी, केळीचे धागे असा कच्चा माल वापरून हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यात आदिवासी भागात आणि दुष्काळी तालुक्यात शेततळे आणि मत्स्यपालनासाठी हा उपक्रम कार्डियन करेक्ट स्वयंसेवी संस्था राबवू इच्छिते, असे संस्थेचे नरेंद्र अमृतकर, पवन कोठावदे आणि गोकुळ पूरकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.