आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजवळपास सहा वर्षांपासून केंद्र सरकारच्या स्वच्छ अभियानात पालिकेची घसरगुंडी उडत असल्याचे बघून २०२३ च्या स्पर्धेत देशातील पहिल्या १० स्वच्छ शहरात चमकण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने नवीन रचना केली आहे. त्यानुसार, ३१ प्रभागांमध्ये स्वच्छता राखण्यासाठी ३१ स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांना सर्वेक्षण पार पडेपर्यंत प्रभाग सोडून जाता येणार नाही. तसेच, मुख्यालयातील दोन अतिरिक्त आयुक्तांसह ६ उपायुक्तांवर शहर स्वच्छतेसाठीचे पालकत्व सोपविण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या स्वच्छ शहर स्पर्धत नाशिकची कामगिरी सुमार राहिली आहे. २०१९ मध्ये दहा लाख लोकसंख्या असलेल्या देशभरातील पाचशे शहरांमध्ये नाशिक शहराचा ६७ वा क्रमांक लागला होता. त्यानंतर पालिकेने जाेरदार तयारी केल्यानंतर २०२० मध्ये नाशिकने ६७ व्या क्रमांकावरून थेट ११ व्या क्रमांकावर झेप घेतली. मात्र २०२१मध्ये मात्र पालिकेची घसरगुंडी उडून १७ व्या क्रमांकावर नाशिक आले. २०२२ मध्ये नाशिकचा क्रमांक थेट २० वर गेल्यामुळे आता त्यामागची नेमकी कारणे काय हे हेरून सुधारणा केली गेली. प्रामुख्याने नागरिकच सुविधांबाबत असमाधान व्यक्त करीत असल्याने नाशिकची पीछेहाट हाेत असल्याचे समाेर आले आहे. ही बाब लक्षात घेत, आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्वच्छ सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील ३१ प्रभागांमध्ये स्वच्छता रहावी यासाठी मुख्यालयातून ३१ अधिकाऱ्यांची आपल्या प्रभागात जावून स्वच्छतेबाबत तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्वेक्षण पूर्ण होईपर्यंत प्रभागातच फिरण्याचे निर्देश दिले आहेत.
अधिकाऱ्यांकडे विभागनिहाय जबाबदारी
शहरात सहा विभाग असून प्रत्येक विभागाला उपायुक्त दर्जाचा अधिकारी दिला गेला आहे. नाशिकरोड विभागासाठी बी. जी. सोनकांबळे, सिडको विभागाकरता डॉ. आवेश पलोड, पूर्व विभागाकरता डॉ. अर्चना तांबे, पश्चिम विभागाकरता नितीन नेर , सातपूर विभागाकरता करुणा डहाळे, तर पंचवटी विभागासाठी नरेश महाजन यांची पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.