आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्य संमेलनात 'फ्रॅक्चर्ड फ्रिडम':पुरस्कार वापसी, समित्यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री, केसरकरांची सारवासारव

पीयूष नाशिककर | महात्मा गांधी साहित्य नगरी, वर्धा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काेबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर्ड फ्रिडम या आत्मकथनाला राज्य सरकारने जाहीर केलेला राज्य वाङमय पुरस्कार रद्द केल्यानंतर अनेकांनी आपले पुरस्कार परत केले हाेते, तर काही जणांनी शासनाच्या समित्यांवरील पदांचे राजीनामे दिले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी या घटनेचा उल्लेख टाळला. मात्र, संमेलनपीठावरून सारवासारव करण्याचा प्रयत्न लपून राहिला नाही.

वर्ध्यातील महात्मा गांधी साहित्य नगरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 3) 96 व्या अ. भा. साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी केसरकर म्हणाले की, साहित्यिक ही ज्याेत आहे. ती तेवत ठेवण्याचे काम आम्ही करताे आहाेत. साहित्यात काेणतेही राजकारण नाही, मतभेद नक्कीच हाेऊ शकतात. मात्र, काेणत्याही हिंसाचाराचे समर्थन कधीही हाेऊ शकणार नाही. दुखावलेल्या, दुरावलेल्या सगळ्याच साहित्यिकांना स्वत: जाऊन भेटलाे. देशाने बॅन केलेल्या विचारांचे कधीही समर्थन हाेणार नाही, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले की, साहित्यात राजकारण्यांचे काय काम असे कायम म्हटले जाते. पण साहित्यात, संमेलनात सरकारचा काहीही हस्तक्षेप नाही. साहित्य आणि राजकारण हे दाेन्ही सामाजिक तळमळीतून येतात. साहित्यिकांकडून नेहमीच चांगली थाप मिळते. चुकीचा निर्णय झाला तर साहित्यातील वरिष्ठांना कान धरण्याचा अधिकार आहे. सरकारच्या मनात साहित्यिकांबद्दल नेहमीच आदाराचे स्थान आहे, अशी सारवासारवही त्यांनी यावेळी केली.

अशी हाेती घटना

शासनाच्या वाङमय पुरस्कारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जाेशी हा पुरस्कार काेबाड गांधी यांच्या फ्रॅक्चर फ्रीडम आत्मकथनाच्या मराठी अनुवाद पुस्तकासाठी अनघा लेले यांना जाहीर झाला हाेता. नंतर ताे रद्द करण्यात आला. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित करत राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्या प्रज्ञा दया पवार आणि कवयित्री निरजा यांनी पदाचा राजीनामा दिला हाेता. तर भुरा कादंबरीचे लेखक शरद बाविस्कर आणि वैचारिक घुसळण पुस्तकाचे लेखक आनंद करंदीकर यांनीही पुरस्कार परत करण्याची घाेषणा केली हाेती. तसेच यशवंतराव चव्हाण पुरस्कार समितीचे परीक्षक हेरंब कुलकर्णी यांनीही साहित्य संस्कृती मंडळाकडे नाराजी व्यक्त केली हाेती. या घटनेमुळे साहित्य वर्तुळात गदाराेळ झाला हाेता.

बातम्या आणखी आहेत...