आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादा भुसे संतापल्यावर `राष्ट्रवादी` नेत्यांनी घेतली माघार!:गावितांनी घेतले महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाण्याचे आंदाेलन मागे

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुविधा मिळत नसल्याच्या कारणामुळे गुजरातच्या सिमेलगत असलेल्या सुरगाणा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी आदिवासी समाजाचे नेते चिंतामण गावित यांच्या मार्गदर्शनाखाली सुरगाणा तालुक्याचा समावेश गुजरातमध्ये करण्याचा व महाराष्ट्र साेडण्याचा ठराव केला हाेता. यासाठी गुजरात सरकारमधील काही अधिकाऱ्यांच्या भेटीही घेतल्या हाेत्या. या हालचालींमुळे महाराष्ट्र सरकारवर प्रचंड दबाव आल्याने पालकमंत्री दादा भुसे यांनी तातडीची बैठक लावली. या बैठकीत आदिवासी नेत्यांनी एकच सुर कायम ठेवल्यामुळे पालकमंत्र्यांनी अतिशय हुशारीने राज्यबदलाच्या नाट्यावरील राजकीय पडदा उघड केल्याने सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना महाराष्ट्रातून बाहेर न पडण्याचे जाहीर करावे लागले.

एकीकडे स्वातंत्र्यांचा अमृत महाेत्सव साजरा करत असताना दुसरीकडे गुजरातच्या सिमेवर असणाऱ्या सुरगाणा तालुक्याला 75 वर्षानंतरही सुविधा पुरविण्यात सरकारला अपयश आल्याचे कारण पुढे करत आदिवासी समाजाचे नेते चिंतामण गावित यांनी सुरगाण्याचा गुजरात मध्ये समावेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या हाेत्या. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमत्री भुसे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

बैठकीत सविस्तर चर्चा हाेऊन सुरगाणा तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. मात्र त्यानंतरही गावित यांनी गुजरात राज्यात विलीन हाेण्याचा निर्णय कायम असल्याचे प्रसार माध्यमांना सांगताच पालकमंत्री संतप्त झाले. शेजारीच बसलेल्या आमदार नितीन पवार यांच्याशी कानगाेष्टी केल्यानंतर आमदार पवार यांनी गावित हे गैरसमजातून बाेलल्याचे सांगितले. मात्र गावितांचा हेका कायम असल्याने पालकमंत्र्यांनी गावितांनी चार दिवसांपुर्वी दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन प्रसार माध्यमांसमाेर दाखवताच ही सर्व खेळी राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचे उघड झाले. त्यानंतर सिमालगतच्या 12 सरपंचांनी आम्हाला महाराष्ट्र साेडायचा नसल्याचे पत्र पालकमंत्र्यांना दिले.

पालकमंत्री संतप्त हाेताच बदलली भूमिका

देशात महाराष्ट्राचे नाव माेठ्या आदराने घेतले जाते. महाराष्ट्राला वेगळी प्रतिष्ठा आणि परंपरा आहे. अनेकांनी बलीदान देऊन हाैतात्म्य पत्कारल्यामुळे आपल्याला महाराष्ट्र मिळाला आहे. सहजासहजी महाराष्ट्र मिळालेला नाही हे लक्षात घ्या असे खडे बाेल पालकमंत्र्यांनी सुनावताच चिंतामण गावित यांनी महाराष्ट्रातून बाहेर पडणार नसल्याचे जाहीर केले.

आमदार पवारांची दुहेरी खेळी

दिंडाेरी लाेकसभा मतदार संघाच्या खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री डाॅ. भारती पवार यांच्या मतदारसंघात सुरगाणा तालुका येताे. याच तालुक्यातून विधान सभेचे प्रतिनिधीत्व आमदार नितीन पवार करत आहेत. पवार कुटुंबियांतील वाद सर्वश्रूत असल्याने व सध्या राज्याच्या सत्तेत भाजपचा समावेश असल्याने आमदार पवार यांनी राष्ट्रवादीच्या पडद्याआडून आंदाेलकांना छुपी मदत केल्याचे बाेलले जाते. यात डाॅ. पवार यांना विचारणा हाेऊ शकते तर दुसरीकडे आमदार पवारांनी प्रस्तावित केलेले पाझर तलावांच्या प्रस्तावाला शासनाकडून तात्काळ मंजुरी मिळेल. अशी दुहेरी खेळी पवारांनी खेळल्याची चर्चा सुरू हाेती.

बातम्या आणखी आहेत...