आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेदम मारहाण:टवाळखोरांकडून ज्येष्ठ नागरिकास रस्त्यात मारहाण, पाेलिसांचे दुर्लक्ष

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढत असतानाच पाेलिसांकडून कुठलीही ठाेस पावले उचलली जात नसल्याने टवाळखोरांची दहशत वाढतच असल्याचा प्रत्यय पुन्हा साेमवारी (दि. ३१) रात्रीच्या सुमाारास इंदिरानगर बाेगद्याजवळ आला. या ठिकाणी कट लागल्याचे कारण काढून टाेळक्याने कारमधील एका ज्येष्ठ नागरिकाला कारबाहेर काढून बेदम मारहाण केली तसेच कारच्या काचा फोडल्या.

तासभर या भागात दहशत निर्माण करत टाेळक्याने रिक्षातून पळ काढला. मात्र, समाेरच असलेले वाहतूक पाेलिस आले नाहीत तसेच इंदिरानगर पाेलिसही आले नाहीत. शेवटी इतर वाहनधारकांनीच ज्येष्ठाला गाडीत बसवत घरी पाठविले. रात्री ८ वाजेच्या सुमारास इंदिरानगर बोगद्याखाली जाॅगिंग ट्रॅकच्या रस्त्यावर सहा जणांच्या टाेळक्याने दहशत निर्माण केली. मद्यपान केलेले गुंड अनेक वाहनांना आडवे जात होते. कुणी काही बोलले तर थेट त्यांचे वाहन थांबवत शिवीगाळ व मारहाण करीत होते. अशाच एका कारला हे गुंड आडवे झाले. कार चालविणाऱ्या ज्येष्ठ नागरिक असलेल्या चालकाने या गुंडांना बाजूला होण्याची विनंती केली. मात्र आम्हाला अक्कल शिकवतो का, असे म्हणत गुंडांनी कारचालकावर हल्ला चढविला. एकाने समोरून कारची काच फोडली. तर इतरांनी कारला मागून लाथा बुक्क्या मारल्या. कारमधील चालकाला नक्की काय झाले हे कळायला मार्ग नव्हता.

केवळ दहशत निर्माण करणे, वर्चस्व सिद्ध करण्यासाठी हे सर्व सुरू होते. घाबरलेल्या अवस्थेतील कारचालकाने तेथून निघून जाणे पसंत केले. तर गुंडांमधील एक भाई नावाच्या मद्यपीने आपण निघा, असा इशारा करीत आरडाओरडा करीत शिवीगाळ करत रिक्षातून (एमएच १५ एफयू ५५३९) पळ काढला. या सर्व प्रकाराने इंदिरानगर बोगद्याखाली वाहतूक कोंडी झाली होती. शिवाय बघ्यांची गर्दी जमा झाली होती. मात्र गुंडांच्या दहशतीमुळे अनेकांनी काढता पाय घेतला.

पाेलिस यंत्रणा अनभिज्ञच : परंतु एवढा सर्व प्रकार घडूनही अवघ्या ५० ते १०० मीटरवर असलेल्या वाहतूक पाेलिसांनी याठिकाणी येण्याचे गांभीर्य दाखवले नाही, तसेच इंदिरानगर पाेलिसांना याबाबत माहितीही दिली नसल्याने आश्चर्य आणि तेवढाच संतापही व्यक्त हाेत आहे.

विशेष म्हणजे, २४ तास उलटूनही या घटनेची साधी नाेंद पाेलिस ठण्यात नसल्याने अथवा पाेलिसांनी स्वयंस्फूर्तीने यावर कुठलीही कारवाई न केल्याने पाेलिस यंत्रणेचा वचकच राहिला नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकाराने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या गुंडावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...