आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Employee Agency; Shortage Of Electricity Meter For General, Pay 3 Thousand To Agent, Get Meter, Contact Number Of Agent Is Given According To Area| Marathi News

डीबी स्टार स्टिंग:कर्मचाऱ्यांचीच एजंटगिरी; सामान्यांसाठी वीज मीटरचा तुटवडा, एजंटला ३ हजार द्या, मीटर घ्या, एरियानुसार दिला जाताे एजंटचा संपर्क क्रमांक

जहीर शेख | नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती वीज जोडणीसाठी महावितरणकडून वीज मीटर उपलब्ध होत नसल्याने चक्क एजंटची मदत घ्यावी लागत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, महावितरणचे कर्मचारीच एजंटकडे पाठवत असल्याचे डी. बी. स्टारने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले आहे.शहरातील महावितरणाच्या उपकार्यालयांमध्ये वीज मीटरसाठी एजंटचा आधार घ्यावा लागत आहे. डीबी स्टारच्या चमूने शहरातील भारतनगर भागातील घरकुल योजनेच्या इमारतीला लागून असलेल्या महावितरणाच्या कार्यालयात नवीन वीज मीटरसाठी काय प्रक्रिया असते यासंदर्भात माहिती घेतली असता या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनीच एजंटचा नंबर देत यांच्याशी संपर्क साधा, असा सल्ला दिला.

असाच प्रकार इतर कार्यालयातही दिसून आला. महावितरणच्या बहुतांश सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. यात वीजमीटर जोडणी घेण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया आहे. तसेच जे ग्राहक ऑनलाइनचा वापर करीत नाहीत, त्यांना महावितरणच्या शाखेत योग्य कागदपत्रे देऊन वीजजोडणी घेता येते. कागदपत्रे घेऊन जाणाऱ्यांना शहरातील अनेक शाखांमध्ये वीजमीटर जोडणी देण्यासाठी विलंब होतो. यात अनेकदा मीटर उपलब्ध नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात नवीन ग्राहकांना वीजमीटर उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

वीजमीटर घेण्यासाठी जागेचा नकाशा, प्रॉपर्टी कार्ड, आधार कार्ड, रहिवासी दाखला, ए वन, डी वन फॉर्म आदी कागदपत्रे दिल्यानंतर कंपनीचे वायरमन येऊन अंदाजित खर्च सांगतात. त्यानंतर अनामत रक्कम भरल्यानंतर वीज मीटरची जोडणी दिली जाते. मात्र, ही सर्व प्रक्रिया केल्यानंतरही मीटरअभावी नागरिकांना नवीन वीज जोडणी दिली जात नसल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे एजंटला लगेचच वीज मीटर उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे.

ग्राहकांना नवीन मीटरसाठी प्रतीक्षा
नाशिक, मालेगावसह अहमदनगर जिल्ह्यांसाठी दर महिन्याला किमान वीस हजारांच्या आसपास वीज मीटरची मागणी असते. मात्र, सध्या मीटरच उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे हजारो ग्राहकांना नवीन मीटरसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे तर एजंटांना वीज मीटर कसे काय उपलब्ध होतात असा प्रश्न उपस्थित हाेत आहे.

या भागांमध्ये अडचण
गंगापूररोड, कॉलेजरोड, पंचवटी, आडगाव, इंदिरानगर, साईनाथनगर, खोडेनगर, वडाळागाव, पाथर्डी फाटा, सातपूरसह सिडकोतील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन इमारतीचे काम सुरू आहे. अनेक प्रोजेक्ट पूर्णही झाले आहे. मात्र, या इमारतींसाठी वीजमीटर मिळत नसल्याने बांधकाम व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

अनेकांचे फ्लॅट हस्तांतरण रखडले
शहरातील नववसाहतींमध्ये दररोज नवीन इमारती तयार होत आहे. त्यामुळे दर महिन्याला विविध भागातील महावितरण कार्यालयात ६०० ते ७०० नवीन मीटरसाठी अर्ज येतात. मात्र, मागील काही महिन्यांपासून या भागासाठी वीजमीटरच उपलब्ध न झाल्याने फ्लॅटधारक अडचणीत आले आहेत. मीटर मिळत नसल्याने अनेकांचे फ्लॅट हस्तांतरण झालेले नसल्याचे ही चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...