आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डी.बी. स्टार पडताळणी:स्वीट मार्ट‌्सची अतिक्रमणे वारेमाप; पार्किंगच्या जागेवरच थाटले टेबल, वाहतूक कोंडीला हातभार

जहीर शेख | नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व परिसरात वाहतूक काेंडीचा प्रश्न गंभीर बनत असून स्वीट मार्टकडून दुकांनाच्या समाेरच पार्किंगच्या जागेवरच टेबल मांडून पाणीपुरी, भेळपुरीसह इतर खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. परिणामी, भररस्त्यातच ग्राहकांना वाहने उभी करावी लागत असल्याने वाहतूक काेंडीला अधिक हातभार लागत असल्याचे समाेर आले आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक याच ठिकाणाहून दिवसातून अनेकवेळा चक्कर मारून जात असतानाही त्यांच्या नजरेतून हा प्रकार कसा काय सुटताे. त्यामुळे त्यांच्या संशयास्पद भूमिकेविषयी वाहनधारकांमध्ये तीव्र संताप व्यक्त हाेत आहे. यांसदर्भात, गंगापूररोडसह पंचवटी, नाशिकरोड, सिडको, सातपूर भागात मिठाईच्या दुकानांच्या अतिक्रमणांमुळे सर्वत्र रस्ते जॅम हाेत असतानाही मनपा व पाेलिस यंत्रणेने घेतलेली नरमाईची अर्थपूर्ण भूमिका यामुळे नागरिक त्रस्त असल्याचे चित्र डीबी स्टारच्या पाहणीत समोर आले. मनपाच्या अतिक्रमणधारकांवरील कृपादृष्टीमुळेच शहरात मिठाई विक्रेत्यांची अतिक्रमणे वाढत असून यामुळे वाहतूक कोंडीत प्रचंड वाढ होत असल्याचे चित्र आहे. यावर डीबी स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत.

मिठाईच्या दुकानासाठी परवाना घेताना दाखविलेल्या पार्किंग क्षेत्राचा वापर व्यवसायासाठी केला जात आहे. ग्राहकांची वाहने रस्त्यावरच लावली जात असल्याचे पाहणीत आढळून आले आहे. शहरात जागोजागी मिठाई खाद्य पदार्थांची दुकाने थाटून असलेल्या अनेक दुकानदारांकडून मोठ्या प्रमाणावर दुकानांपुढील जागेवर कब्जा केला जात असल्याच्या तक्रारी ही डी.बी. स्टारकडे आल्या आहेत. डीबी स्टारने शहरातील काही भागात पाहणी केली असता या दुकानांची अतिक्रमणे थेट रस्त्यापर्यंत आल्याचे आढळून आले. या दुकानांवर महापालिका प्रशासनाकडून वारंवार कारवाई होऊनही अतिक्रमणे नव्याने उभी राहात असल्याचे दिसून आले.

महापालिकेकडून अतिक्रमणांकडे दुर्लक्ष : गंगापूररोडवरील माने कॉलनी आणि शरणपूररोड, तिडके कॉलनी, पखालरोड, पंचवटी परिसर व सिडको भागात थाटलेल्या स्वीट मार्टच्या दुकानात येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांची पार्किंग रस्त्यावर होत असल्यामुळे या परिसरात दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते. सायंकाळच्या सुमारास गंगापूररोडवरील कुसुमाग्रज स्मारक मार्गावरील स्वीट मार्टचे ग्राहक त्यांची वाहने थेट रस्त्याच्या मध्यभागापर्यंत पार्क करतात. याचा फटका सर्वसाधारण नागरिकांना सहन करावा लागतो. मात्र, या अतिक्रमणाकडे महापालिकेकडून सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.

अतिक्रमण निर्मूलन खर्च वसुली नाहीच
नागरिकांकडून अतिक्रमण काढण्यात आले नाही आणि महापालिकेकडून जर मोहिमेत अतिक्रमण हटवण्यात आले तर त्यापोटी येणारा खर्च संबंधित अतिक्रमणधारकांकडून वसूल केला जातो. अतिक्रमणधारकांनी ताे दिला नाही तर त्याच्या घरपट्टीवर त्याचा बोजा लावला जातो. प्रत्यक्षात मात्र महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून अशी कारवाई होताना दिसत नाहीये.

अनेक सिग्नलवर व मुख्य चाैकातच स्वीट मार्ट
अनेक ठिकाणी सिग्नलवरच स्वीट मार्ट असून या स्वीट मार्टमुळेच या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. पंचवटी परिसरातील मेरी कॉर्नरजवळ असलेल्या स्वीट मार्टचे अतिक्रमण काही महिन्यांपूर्वी महापालिकेने हटविले होते. त्यानंतर संबंधित दुकानदाराकडून पुन्हा नव्याने अतिक्रमण करण्यात आले. तसेच, कॉलेजरोडवरील माॅडेल काॅलनी चाैकातील स्वीट मार्ट हे ही चौकात असून त्याच्यामुळेही येथे भागात वाहतूक कोंडी होते. अशोका रोडवरील व आता अशोका सिग्नलला लागूनच नव्याने सुरू करण्यात आलेल्या स्वीट मार्टच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे.

पाणीपुरी, दाभेलीचे स्टॉलही दुकानांबाहेरच
शहर‍ातील जवळपास सर्वच स्वीट मार्टच्या दुकानांच्या बाहेर पाणीपुरी, दाभेलीचे स्टॉल लावण्य‍ात आलेले आहे. यात सर्वाधिक गंगापूररोडवरील माने कॉलनी आणि शरणपूररोड, तिडके कॉलनी, पखालरोड, पंचवटी परिसर व सिडको भागात आहेत.

सिटी सेंटर माॅलवरून आरडी सर्कलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुलाजवळीच नव्याने सुरू झालेल्या अमर रेस्टाॅरंट ज्यूस सेंटरने पार्किंगच्या जागेवरच टेबल थाटले आहे. नऊ वाजेपासून हे स्टॉल दुकानांच्या बाहेर लावतात तर रात्री दुकान बंद करताना ही स्टॉल परत दुकानात घेतली जातात. महापालिकेकडून अतिक्रमण मोहीम सुरू असताना ही स्टाॅलबाहेरच काढली जात नाही, या स्टॉलवर कारवाई होत नाही. त्यामुळे कारवाईनंतर हे स्टॉल पुन्हा दुकानाबाहेर उभे राहतात.

अतिक्रमण विभागाकडून दाेषींवर कडक कारवाई व्हावी
स्वीट मार्टने पार्किंगमध्ये दुकाने थाटल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहने थेट रस्त्यावर लावली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. महापालिकेकडून अशा दुकानदारांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे.- प्रशांत खैरनार, वाहनचालक

बातम्या आणखी आहेत...