आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिकमध्ये अनेक तरूणांनी संशाेधनाचे नवे अध्याय रचले असून आता के.के.वाघ इंजिनिअरिंग मध्ये अभियांत्रिकी वर्षाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने शेतकऱ्यांचे भवितव्य सुखी व्हावे या उद्देशाने केलेले नवनिर्माण अनेक अर्थाने महत्वाचे ठरू शकणार आहे. आर्या मिश्रा असे या तरूणीचे नाव असून तीने बॅटरीवर चालणारा ट्रॅक्टर निर्माण केला आहे. सहा तासांच्या चार्जिंगमध्ये साेळा तास ट्रॅक्टर काम करताे हे विशेष!
शेतीमध्ये अनेक कामांसाठी ट्रॅक्टरचे महत्व शेतकऱ्यांसाठी अनन्यसाधारण आहे. नाशिकसारख्या कृषी प्रधान जिल्ह्यात तर ते स्पष्टपणे अधाेरेखीत हाेत असते. डिझेलच्या वाढत्या किमती तसेच त्यातून होणारे प्रदूषण यावर पर्याय म्हणजे बॅटरीवर चालणारा हा ट्रॅक्टर आर्याने तयार केला आहे, जाे, 7.5 अश्वशक्तीचा असून त्यामध्ये 48 व्हाेल्टची बॅटरी लावण्यात आली आहे. हा ट्रॅक्टर ए.सी.मोटर वर चालताे तसेच शेतामध्ये पिकांवर औषध फवारणी, पेरणी, नांगरणी अगदी सक्षमपणे करू शकतो. मागील आठवड्यातच या ट्रॅक्टर ची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
आर्या ही इंजीनिअर चंद्रभान मिश्रा यांची मुलगी आहे. चंद्रभान मिश्रा यांनी 1984 मध्ये बॉटलपेक हे तंत्रज्ञान जर्मनीतून भारतात आणून नाशिकच्या सातपूर औद्याेगिक वसाहतीमध्ये कारखाना सुरु केला होता. आर्याला या प्रकल्पासाठी के. के. वाघ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. समीर वाघ, प्राचार्य डॉ .केशव नांदुरकर, उपप्राचार्य डॉ शिरीष साने, डॉ. रविंद्र मुंजे, शंतनू शुक्ला, डॉ.शरद धुमाळ, इंजिनिअर मनीष मिश्रा व इंजिनिअर.प्रेमलता मिश्रा यांनी मार्गदर्शन केले. तसेच अनिष रच्चा आणि कांचन शिंदे यांनी सहकार्य केले.
सहा महिन्यात उत्पादन सुरू करणार
संशाेधक आर्या मिश्रा म्हणाली, सध्या आमचे संशाेधन व विकासाचे काम पुर्ण झाले असून यशस्वी चाचण्याही झाल्या आहेत. स्टार्टअपच्या माध्यमातून येत्या सहा महिन्याचे याचे उत्पादन आम्ही सुरू करण्याच्या तयारीत आहाेत. या पहिल्या प्राेटाेटाईपकरीता 4.85 लाख रूपये खर्च झाला त्यापैकी 2.67 लाख बॅटरीचा खर्च आहेत. उत्पादन करतांना हा एकुण खर्च कमी हाेऊ शकणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.