आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहैदराबाद-मराठवाडा मुक्ती संग्राम एकाधिकारशाहीविरोधात होता. या लढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाची जाणीव प्रत्येक भारतीय नागरिकांनी कायमस्वरूपी ठेवायला हवी, या हुतात्म्यांची माहिती तरुण पिढीला हाेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांनी केले.
डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे १०८ वे पुष्प गुंफताना ‘अखंड महाराष्ट्राची शौर्यकथा : हैदराबाद-मराठवाडा मुक्ती संग्राम’ या विषयावर ते बोलत होते. मूलभूत हक्क आंदोलन संघटनेच्या वतीने सावानाच्या औरंगाबादकर सभागृहात कार्यक्रम झाला. डॉ. नागार्जुन वाडेकर, वासंती दीक्षित व्यासपीठावर उपस्थित होते. भालेराव यांनी मुक्ती संग्रामातील अनेक बारकावे उलगडत इतिहासाला उजाळा दिला. सातवा निजाम अतिश्रीमंत होता. महागडा जेकब नामक हिरा तो पेपरवेट म्हणून वापरत असे.
त्याची राजवट लोकांची पिळवणूक करणारी, जातीयवादाने पछाडलेली होती. जबाबदार राज्यपद्धती आणावी, धार्मिक स्वातंत्र्य द्यावे, अशी जनतेची मागणी होती. महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्वामी रामानंदतीर्थ यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. रंगराव पागे यांनी या संग्रामातील पहिले बलिदान दिले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले असल्याचे ते शेवटी म्हणाले. प्रास्ताविक प्रा. डॉ. मिलिंद वाघ यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.