आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताची साेय:गॅस पाइपलाइनसाठी खाेदकाम, डांबरीकरणासाठी मुहूर्त लांब

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मानगर भागातील रस्त्यांवर गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले. पाइपलाइन टाकल्यानंतर खोदलेले रस्ते व्यवस्थित बुजविलेले नाहीत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मातीचे ढिगारे पडले आहेत. तर काही ठिकाणी दबाई नीट न केल्याने रस्ता वाहतुकीसाठी खडतर झाला आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांसह वाहनचालक तसेच व्यावसायिकांना अनेक अडचणींचे हाेत आहे. या भागात लहान-माेठे अपघातही वाढले आहेत.

महात्मानगर सिग्नल ते थेट भोंसला महाविद्यालयाच्या गेटपर्यंतच्या परिसरातील दोन्ही बाजूचे रस्ते महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी खाेदले आहेत. खोदकाम करताना ठेकेदाराने लक्ष न दिल्याने अनेक सोसायट्यांमध्ये जाणाऱ्या पिण्याच्या पाइपलाइन, इलेक्ट्रिक केबल, तसेच पथदीपांच्या केबल तुटल्या आहे. यामुळे अनेक सोसायटींमध्ये जाणारा पाणीपुरवठा काहीकाळासाठी खंडित झाला होता. तर केबल तुटल्याने अनेकांची विद्युत उपकरणे बंद पडली होती.

या भागात पाइपलाइनमुळे खड्डे कायम
एबीबी सर्कलपासून ते जेहान सर्कलपर्यंतचा रस्ता दाेन्ही बाजूने खाेदलेला आहे. महात्मानगर पाण्याच्या टाकीपासून पुढे समर्थनगर, भोंसला मिलिटरी स्कूल, मॉडेल कॉलनी, जेहान सर्कल, कृषीनगर जॉगिंग ट्रॅक तसेच महात्मानगर पाण्याच्या टाकीपासून सरळ खाली वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तर माेठे खड्डे आहेत. महात्मानगरपासून सातपूर पोस्ट ऑफिसच्या मागील बाजूच्या अंतर्गत रस्त्यावर खड्डे तसेच आहे. येवलेकर मळा, कॉलेजरोडच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर रामदास कॉलनी परिसरातही परिस्थिती वेगळी नाही.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष
शहरात अनेक ठिकाणी गॅस पाइपलाइनच्या नावाखालीही खोदकाम करत रस्ते दुरुस्त न करता तसेच सोडून निघून गेल्याने नागरिक हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे बांधकाम अभियंत्यांसह आयुक्तांकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे याविषयी अधीक्षक अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्कच होत नसल्याचे चित्र आहे.

रस्ता दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदारांचीच, त्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत...
गॅस पाइपलाइनसाठी शहरात रस्ता खोदण्यात आला होता. खोदलेला रस्ता दुरुस्त करण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदारांचीच आहे. यासंदर्भात अधीक्षक अभियंत्याकडून ठेकेदारांना सूचना ही करण्यात आलेले आहे.- एम. टी. हरिश्चंद्र, विभागीय अधिकारी, पश्चिम विभाग

बातम्या आणखी आहेत...