आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोर'धारा' ओसरणार:मुंबईसह कोकण, दक्षिण भाग वगळता उर्वरित महाराष्ट्रात पाऊस ओसरणार, इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची शक्यता

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गत तीन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. अतिपावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांचे नुकसान होत आहे. आगामी आठवड्यातदेखील पाऊस राहणार आहे, मात्र त्याचा जोर कमी राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

राज्यात शनिवार ( ३ सप्टेंबर) पासून पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार (६ सप्टेंबर) पर्यंत कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. मुंबईसह संपूर्ण कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील आठवडाभर जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात तसेच नाशिक जिल्ह्यातील दक्षिणेतील त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, सिन्नर, निफाड, येवला तालुक्यात मात्र कदाचित मुसळधार पावसाचीही शक्यता आहे. मात्र खान्देश, अमरावती, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता आहे.

सिन्नरमध्ये ३ तासांत १६५ मिमी पाऊस

सिन्नर शहरासह तालुक्यात गुरुवारी रात्री तीन तासांत १६५ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली. या अतिमुसळधार पावसामुळे शहरातील सरस्वती नदीला १९६९ नंतर ५६ वर्षांनी प्रथमच आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील १०० घरांबराेबरच शहरातील ४० दुकाने बाधित झाली. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले तर व्यावसायिकांचे काेट्यवधींचे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार या पावसामुळे २८ गावांतील २३४२ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले. आठ रस्ते वाहून गेले तर तीन पूल खचले आहेत. पावसामुळे पाच हजार काेंबड्यांचाही मृत्यू झाला आहे. शहरातून बेपत्ता असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह दातली शिवारातील देवनदीच्या पात्रात आढळून आला आहे. सिन्नर शहरातील नाशिक वेस, गणेश पेठ, नेहरू चौक, भैरवनाथ मंदिराच्या समोरील व नाशिक वेशीमधील गाळ्यांमध्ये सुमारे तीन ते चार फूट होते.

परतीच्या पावसाची वाट पाहावी लागणार

परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण नसून कदाचित तिसऱ्या आठवड्यापर्यंतही वाट पाहावी लागेल. बुधवारपासून वातावरणात बदल होत असून १० सप्टेंबरदरम्यान संपूर्ण कोकण व नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...