आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवानिवृत्त पोलिस:35 वर्षांनंतर महाराष्ट्र पोलिस अकॅडमीत अधिकाऱ्यांची कवायत ; राज्यातील 150 सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आले पुन्हा एकत्रित

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्याच्या पोलिस दलात तब्बल ३५ वर्षे वेगवेगळ्या शहर-जिल्ह्यात कर्तव्य बजावलेल्या १९८७ बॅचचे सेवानिवृत्त अधिकारी खूप वर्षांनंतर एकत्र आले. त्यांनी पोलिस दलातील आताचे आधुनिक बदल पोलिस विभागाला बळकटी देणारे असल्याचे सांगितले अन् सर्व जुन्या आठवणींमध्ये ते रममाण ‌झाले. निवृत्त अधिकारी विनोद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नियोजन करीत १५० जणांना महाराष्ट्र पोलिस अकॅडमी येथे आयोजित स्नेहसंमेलनात सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. त्यात १० महिला पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश होता. सेवानिवृत्त झालेल्या आणि त्या उंबरठ्यावर असणाऱ्या सर्वांनाच अजूनही तरुण असल्याचा आनंद मिळाला. १५ जून १९८७ ते ३१ मे १९८८ या वर्षभरात नाशिकच्या पीटीसीमध्ये महाराष्ट्रातील ३०० व गोव्यातील २८ युवकांनी कठोर प्रशिक्षण घेतले. त्यात ३० युवतींचीही प्रथमच एमपीएससीद्वारा निवड झाली होती. त्या साऱ्यांना एकत्र आणून नाशिकला दोन दिवसांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. बहुतेकजण सेवानिवृत्त झाले. ४६ जण दिवंगत झाले. मात्र महिला अधिकाऱ्यांसह १५० जणांनी सहभाग नोंदवला. अकॅडमीचे कार्यकारी संचालक शिवाजी पवार म्हणाले, या स्नेहसंमेलनाने आपण सर्व एक आहोत ही भावना बळकट केली आहे. संचालक राजेश कुमार यांच्या हस्ते सर्वांना स्मरणचिन्ह देण्यात आले. १९८७ सालच्या बॅचच्या अनेकांनी वरिष्ठ दर्जाचे पोलिस अधिकारी म्हणून सेवा बजावली. अनेकजण सन्मान पदक विजेते असून दोन महिलांनी शिवछत्रपती पुरस्कार मिळवले आहेत. आमचे सहकारी शशांक शिंदे मुंबई बॉम्बस्फोटात शहीद झाले. आज ३५ वर्षांनी पीटीसीत येताना सर्वांचाच ऊर अभिमानाने भरून आला असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले. गोव्याहून आलेले महेश गावकर व महिला अधिकाऱ्यांतर्फे गोपिका जहागिरदार यांनी मनोगतात व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले. स्नेहसंमेलनाच्या यशस्वितेसाठी निशिकांत पाटील, शिवाजी शिंदे, शेखर तावडे, जगन पिंपळे यांनी परिश्रम घेतले. वसतिगृहातील खोल्या, वाचनालय, जलतरण तलाव, आधुनिक फायरिंग रेंज, सिंथेटिक ग्राउंड व विविध विभागांना उपस्थित निवृत्त पाेलिस अधिकाऱ्यांनी भेट देत बदलते स्वरूप जाणून घेतले.

बातम्या आणखी आहेत...