आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्स्पोज:अंगणवाडीत चिमुकल्यांना दिली रक्तवाढीची मुदतबाह्य औषधे

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडकोत राणाप्रताप चौकातील एका अंगणवाडीत ४० ते ५० बालकांना रक्तवाढीचे मुदतबाह्य औषध दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दिलेल्या औषधांवर एक्स्पायरी डेट मे २०२२ अशी असल्याचे ‘दिव्य मराठी’च्या पाहणीतही आढळून आले. या प्रकारामुळे पालक संतप्त झाले असून पाल्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.

राणाप्रताप चाैक ते सावरकर चाैकातील तीन अंगणवाड्यांत पालिकेच्या आराेग्य विभागाकडून तपासणी केली जाते. वजन कमी वा कुपाेषणाची लक्षणे असल्यास त्यांना आशा वर्करच्या माध्यमातून रक्तवाढीची औषधे दिली जातात. साेमवारी (दि. २२) दुपारी राणाप्रताप चाैकातील कालिका मंदिराजवळील अंगणवाडीत ४० विद्यार्थ्यांना आयर्न अॅण्ड फाेलिक अॅसिड सिरप हे औषध देण्यात आले. तर इतर अंगणवाडीतही पॅरासीटॅमलच्या गाेळ्या देण्यात आल्या. दाेन-तीन पालकांना औषधांवरील एक्स्पायरी डेट मे २०२२ आढळली. त्यांनी अंगणवाडीसेविकांना कळविले. त्यानुसार ज्या आशा वर्करकडून ही औषधे मिळाली त्यांनाही हा प्रकार सांगताच त्यांनी पालकांचे घर गाठत औषधे परत घेतल्याचे अंगणवाडीसेविका व आशा वर्कर यांनी नाव न छापण्याची विनंती करत सांगितले.

मुदताबह्य औषधांच्या वितरणाला जबाबदार काेण?
ज्या अंगणवाडीतून मुदतबाह्य औषधांचे वितरण झाले असेल त्याची चाैकशी केली जाईल. त्यावरील बॅच नंबर तपासून काेणामार्फत पुरवठा झाला, किती साठा आहे, ते चाैकशी करून संबंधित पुरवठादारासह वितरीत करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

मुलांंवर काय परिणाम?
मुदतबाह्य औषधे देणेच मुळात चुकीचे आहे. ते घातक ठरू शकते. काहींना त्रास हाेऊ शकताे. शक्यताे त्याची मात्रा कमी असल्याने गंभीर परिणाम हाेण्याची शक्यता कमी असते.

शहरात किती अंगणवाड्यांना औषधे दिली जातात?
३०० हून अधिक अंगणवाड्या असल्या तरी त्यात महापालिकेच्या अंतर्गत १६० अंगणवाड्यांना आैषधे दिली जातात.

खरेदी काेणाकडून होते?
मनपा, महिला बालविकास, जि. प. अंतर्गत अंगणवाड्यांतील बालकांना आैषधांचा पुरवठा हा शासनाकडूनच हाेताे.

पालकांच्या घरी जात औषधे तब्यात
पालकांकडून माहिती मिळताच त्यांच्याशी फाेनवर संपर्क साधत त्यांना सतर्क केले. तर ज्यांच्याशी फाेनवर संपर्क झाला नाही त्यांच्या घरी जात आैषध परत घेतले. या आैषधांचे आठ ते दहा बाॅक्स आम्हाला मिळाले. त्यात एका बाॅक्समध्ये मुदतबाह्य आैषधे मिळाल्याचे तपासणीनंतर उघडकीस आले.
आशा वर्कर

बातम्या आणखी आहेत...