आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात धोका पत्करून निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेण्यात बागलाण, देवळा आणि मालेगाव तालुक्यातील शेतकरी सक्षम मानले जातात. मात्र निफाड तालुक्यातही दरवर्षी नैसर्गिक बदलांचे आव्हान स्वीकारून निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. नांदूरमध्यमेश्वर येथील मच्छिंद्र गाजरे यांनी यंदा जास्त व अवकाळी पावसाच्या संकटाला समर्थपणे ताेंड देत उत्पादित केलेली द्राक्षे रशिया आणि दुबई येथे निर्यात होत आहेत. त्यांना प्रति किलो १४१ रुपये दर मिळत आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे त्यांचे पन्नास ते साठ क्विंटल उत्पादन कमी दर्जाचे आल्याने किलोमागे ५० रुपये दरानेही नुकसान झाले आहे. त्यावर मात करून त्यांनी निर्यात केली, हे विशेष! गाजरे यांनी दीड एकर क्षेत्रावर शरद सिडलेस जातीच्या रंगीत द्राक्षांची लागवड केली. आॅक्टाेबर छाटणी दाेन महिने आधी म्हणजे आॅगस्टमध्येच केली. निफाड तालुक्यात सर्वात प्रथम द्राक्षांची काढणी ते करतात. यंदाही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांनी काढणीला सुरुवात केली. पहिलाच टप्पा रशिया व दुबईत निर्यात केला जात आहे. बागलाण, देवळा आणि मालेगाव तालुक्यात नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे बहुतांश द्राक्षांना तडे गेले असून त्यामुळे गाजरे यांच्या द्राक्षांना मागणी वाढली आहे.
अशी केली संकटावर मात... ब्लोअरने सुकविले पोंग्यातील घड अन् वाचविली बाग सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होता. निफाड तालुक्यातही पाऊस असल्याने गाजरे यांच्या मळ्यात पोग्यांतील द्राक्ष पावसामुळे भिजले. त्यांना गळकूज लागली. यावर उपाय म्हणून त्यांनी संपूर्ण बागेत पंखे लावले. ब्लोअरच्या सहाय्याने घड सुकविले. त्यानंतर औषधांची फवारणी करून बाग वाचवली. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढला. सुमारे ६० क्विंटल उत्पादन घटले. २०० ते २२० ऐवजी १४१ रुपये प्रति किलो दर मिळाला तरी त्यावरही समाधानी असल्याचे गाजरे यांनी सांगितले. गाजरे यांची निर्यात हाेत असलेली द्राक्षे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.