आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बारावीत दोनदा नापास, मात्र वाचनाने सावरले अन् आयपीएस झालो; अनिल पारसकर यांची कहाणी त्यांच्याच शब्दात

दिव्य मराठी विशेषएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बारावीचा मार्क मेमो हा काही आयुष्याचा सातबारा नसतो. या परीक्षेत अपयश, आले म्हणजे पराभव होत नसतो. बारावीत दोनदा नापास होऊनही वाचन अन् जिद्दीच्या बळावर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून आयपीएस झालेले आणि सध्या राज्याच्या गुप्तवार्ता विभागाचे उपायुक्त म्हणून कार्यरत असलेले अनिल पारसकर सांगताहेत त्यांची कहाणी, त्यांच्याच शब्दांत...

नापास? हो! मी बारावीत एकदा नाही दोनदा नापास झालो. अपयश आल्याचं वाईट वाटलं, मात्र पराभूत झाल्याची भावना नव्हती. खरं तर आमच्या शेतकरी कुटुंबात कुणी बारावीपर्यंत पोहोचलेलं नव्हतं. त्यामुळे त्यांचा मोठा दबाव नव्हता. शिकतोय याच भूमिकेतून ते प्रोत्साहन देत होते. त्यातून मिळालेली ताकद व अवांतर वाचनातून मिळणारी प्रेरणा यामुळे बारावीतील त्या अपयशावर मात करून आज मी राज्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या उपायुक्तापदापर्यंत मजल मारू शकलो.

माझा जन्म विदर्भातील अकोला जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातला. वडील अकरावीपर्यंत शिकलेले. तेव्हाची समाजरीत म्हणून दहावीनंतर सायन्सला प्रवेश घेतला. गणित उमजत नव्हतं, पण ते सांगण्याची लाज वाटत होती. अखेरीस बारावीच्या परीक्षेत गणितात दोनदा “नापास’ हा शिक्का गुणपत्रिकेवर पडला. हा टप्पा केवळ आयुष्यातील एक लढाई आहे, परंतु ते अंतिम युद्ध नाही. हे मनाशी नक्की केलेलं. अपयशाच्या त्या टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी अवांतर वाचन हेच प्रेरक ठरलं. या वाचनामुळेच नकारात्मक भावना हाताळण्याची, तर्कसंगत विचार करण्याची, स्वत:च्या कौशल्यांची ओळख करून घेणं शक्य झालं. चिकित्सक पद्धतीने विचार करण्याची शिस्तही लागली. वाचनातूनच भविष्याबद्दल स्वप्न बघणं आणि वर्तमानातील प्रश्नावर उत्तर शोधणं शक्य झालं. गणित हा आपला अडथळा आहे, तेव्हा त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करता येईल यावर लक्ष केंद्रित करीत असतानाच भविष्यात आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे हे स्वप्नही एकाच वेळी पाहिलं. वर्तमानात अडकून न पडता भविष्याचा विचार हाच अपयशातून बाहेर पडण्यासाठी उपयुक्त पडल्याचं स्वानुभवाने सांगताे. स्वामी विवेकानंद, एपीजे अब्दुल कलाम, ‘झाडाझडती’कार विश्वास पाटील, अविनाश धर्माधिकारी यांचे एक विजयपथ, सेल्फ हेल्प पुस्तके या वाटेवर माझ्यासाठी प्रेरक ठरली. या वाचनामुळेच डॉक्टर किंवा इंजिनिअरिंग या चाकोरीबाहेर अनेक क्षेत्रे आहेत, पुस्तकी ज्ञानापलीकडे आपले व्यवहारज्ञान, आपली अन्य कौशल्ये यांना वाव असलेल्या अनेक संधी आहेत, मार्ग आहेत हे मला कळलं. त्यातूनच स्पर्धा परीक्षांची माहिती मिळाली व त्यावर लक्ष केंद्रित करून ते आव्हान मला पार करता आलं. अखेरीस बारावीतील दोन अपयशांनी खचून न जाता, आयपीएस अधिकारी बनण्याचं मोठं स्वप्न पूर्ण करता आलं.

कळकळीनं सांगतो...
अपयश अंगाला लावून घेऊ नका. दहावी-बारावीची परीक्षा तुमचे कर्तृत्व, आयुष्यातील यश-अपयश, तुमचे आयुष्य ठरवत नाही. ही फक्त एक फेज आहे. ती येते तशी संपतेही. याचा व तुमच्या कर्तृत्वाचा काही संबंध नाही. शिक्षण पद्धतीतील ती एक परीक्षा आहे. लाखो विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून ती आखलेली असते. तुमची क्षमता त्यापेक्षा वेगळी असू शकते. ती ओळखणे व त्यानुसार ध्येय निश्चित करणे यातूच आपण खऱ्या अर्थाने घडतो. लहान अपयशाने खचून जाऊ नका. मोठे ध्येय ठेवा.’
(शब्दांकन : दीप्ती राऊत)

गुणपत्रक गुणवत्तेचे अंतिम मानक नाही, पाल्यांना अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे , वाचा तज्ज्ञांचा सल्ला

बातम्या आणखी आहेत...