आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्स्पोज:पुनमियाच्या जमीन खरेदीतील बनावट उतारा सरकारी फाइलमधून गायब, अन्य तीन उतारेही एनए प्लॉट्सचे

नाशिक / दीप्ती राऊत13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फरार परमबीरसिंगांच्या तीन गुन्ह्यांतील सहआरोपी पुनमियाचे सिन्नर कनेक्शन

सिन्नरच्या संशयास्पद जमीन खरेदी प्रकरणातील बनावट ७/१२ उताराच शासकीय दस्तातून गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्यातील संशयित आराेपी संजय पुनमिया याने ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील उताऱ्यावर केलेल्या फेरफाराचे पुरावे ‘दिव्य मराठी’च्या हाती लागले आहेत.

पुनमिया हा मुंबईचे माजी व फरार पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांच्या विराेधातील तीन गंभीर गुन्ह्यांमध्ये सहआराेपी आहे. धारणगाव येथे २००७ साली पुनमियाने ही जमीन खरेदी केली हाेती. त्या वेळेस त्याने जाेडलेले तीनही उतारे बनावट संशयास्पद ठरत आहेत. पहिला उतारा तिसऱ्याच व्यक्तीच्या नावे असून अन्य तीन उतारेही भाईंदरमधील एनए प्लॉट्सचे असल्याचे पुढे येत आहे. ठाण्यातील दुसऱ्या एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला पुनमिया सध्या खासगी रुग्णालयात असून सिन्नरमधील गुन्ह्याच्या तपासात त्याला ताब्यात घेण्यासाठी नाशिक पाेलिसांना परवानगी मिळाली आहे. पुनमियाने उत्तनमधील ज्या बनावट ७/१२ उताऱ्याच्या आधारे धारणगावच्या जमिनीची खरेदी केली तो उताराच मूळ खरेदीखतातून गायब असल्याचे पुढे आल्याने या प्रकरणाभाेवतीचे यंत्रणेतील संशयाचे ढगही गडद झाले आहेत.

उतारा १ : सर्व्हे क्र. २०३/२४ अ, गाव उत्तन, ता. ठाणे
{२००७ साली सिन्नर तालुक्यातील धारणगाव येथे जमीन खरेदी करण्यासाठी संशयित आराेपी संजय पुनमिया याने वापरलेले वरील बनावट ७/१२ उतारे. ठाणे जिल्ह्यातील उत्तन गावातील सर्व्हे क्र. २०३/२४ अ यावर स्वत:चे नाव टाकून पुनमियाने खरेदीखतासाेबत जाेडले हाेते. सदर ७/१२ उताऱ्यावरील मूळ मालक कयोमर्झ कावस पालिया यांचे नाव व्हाइट इंकने खाेडण्यात आल्याचा संशय आहे.

उतारा २ : सर्व्हे क्र. ५६१/१
मे. संध्या एंटरप्रायझेसतर्फे भागीदार संजय मिश्रीमल पुनमिया सदर उतारा : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील बिगरशेती प्लॉट. (संदर्भ : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अर्ज १० एप्रिल २००६)

उतारा ३ : सर्व्हे क्र. ७०/१
मे. लीना हाैसिंगचे भागीदार संजय मिश्रीमल पुनमिया { सदर उतारा : मीरा-भाईंदर महापालिका हद्दीतील बिगरशेती प्लॉट. (संदर्भ : ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील अर्ज १४ ऑगस्ट २००७)

बातम्या आणखी आहेत...