आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय आयुक्तांचे बनावट व्हाॅटसअ‌ॅप खाते:पालिका आयुक्तांपाठोपाठ आणखी एका अधिकाऱ्याच्या नावाने फसवणुकीचा प्रयत्न

नाशिक / प्रतिनिधी14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअ‌ॅप अकांऊट उघडून पैशांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस येवून काही तास उलटत नाही तोच आता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांचेही कोणीतरी नावे बनावट व्हॉट्सअ‌ॅप अकाऊंट उघडल्याचा प्रकार समोर आला आहे. यासंर्दभात, खुद्द आयुक्त गमे यांनीच आपल्या नावाने बनावट व्हॉट्सअ‌ॅप खाते उघडल्याचे सांगून त्यास कोणीही प्रतिसाद न देण्याचे आवाहन केले आहे. याबाबत शुक्रवारी रात्री उशिरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशासकीय अधिकाऱ्यांचेच व्हॉट्सअ‌ॅप हॅक

भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या नावानेच अशा प्रकारे व्हॉट्सअ‌ॅप हॅक करून फसवणुकीचे प्रकार घडत असल्याने सायबर पोलिसांकडून वेळीच हे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी मनपा आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांच्या नावाने महापालिकेतील अधिकारी व त्यांच्या मित्रांना कॉल येऊन पैशांची मागणी केली होती. त्याचबरोबर संदेशाद्वारे मी अडचणीत असून तातडीने पैसे पाठवून मदत करण्यास सांगितले होते. हा प्रकार समोर येताच डॉ. पुलकुंडवार यांनी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यंच्याकडेच तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच, ज्या मोबाइल क्रमांकावरून कॉल व संदेश आले, त्याची चौकशी करताच तो मोबाइल क्रमांक मंचरमधील व्यक्तीचा असल्यचो निष्पन्न झाले.

नातेवाईकांकडे पैशांची मागणी

या घटनेपाठोपाठ शुक्रवारी (दि. ५) विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्वत:हून शासकीय अधिकारी व त्यांच्या नातेवाईकांना कळविले की, त्यांचे छायाचित्र असलेला डीपी ठेवून एका मोबाइल क्रमांकावरुन व्हॉट‌्टसअ‌ॅप अकाऊंट तयार करण्यात आले आहे. या मोबाइल क्रमांकावरुन अधिकाऱ्यांना किंवा कुणाला संदेश आला तर नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, कोणीही कसलेही पैसे अथवा काहीही मदत करू नये. असे संदेश आले तर लागलीच सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असेही गमे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...