आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Amol Gupte | Divya Marathi | Famous Filmmaker Amol Gupte's Dialogue With 'Divya Marathi' Team; The Decline Of Bollywood Due To Marketization, But The Satisfaction That The Film Is Alive In Marathi Soil

दिव्य मराठी विशेष:प्रसिद्ध चित्रपटकार अमोल गुप्तेंचा ‘दिव्य मराठी’च्या टीमसोबत संवाद; बाजारूपणामुळे बॉलीवूडची घसरण, मराठी मातीत मात्र चित्रपटकला जिवंत असल्याचे समाधान

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनोरंजनाच्या नावाखाली बॉलीवूड मूल्ये व कलेपासून दूर जात असल्याची खंत प्रसिद्ध चित्रपटकार अमोल गुप्ते यांनी व्यक्त केली. जागतिक सिनेमा हा दर्जाची उच्चतम पातळी गाठत असताना, बॉलीवूड मात्र बाजारूपणामुळे रसातळाला गेल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मराठीत मात्र त्या तुलनेत चांगली चित्रपट निर्मिती होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आपल्याकडे चित्रपटातील प्राण्यांच्या वापराबद्दल संवेदनशीलता बाळगली जाते, मात्र मुलांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. “दिव्य मराठी’च्या नाशिक कार्यालयात टीमसोबत त्यांनी साधलेला हा खास संवाद.

नाशिकने मला “हीरो’ केलं...

ते दिवस मी कधीच विसरणार नाही.. मिलिंद रानडे, आमचा मित्र मिल्या.. त्याच्यामुळे मी नाशिकला आलो. १९९० साल होतं ते. तो एक सिनेमा बनवत होता लुटालूट.. त्यात मी हीरो होतो. तेव्हापासून सुरेश कापडिया, डॉ. योगेश कुलकर्णी हे मित्र मिळाले. त्याचे निर्माते होते चंद्रकांत नाकील. विठ्ठल पार्कमध्ये तीन-चार महिने मी राहत होतो. खूप मस्त दिवस होते ते. त्यानंतर संपर्क थोडा तुटला होता. त्यानंतर मला कोरोना झाला आणि डॉ. कुलकर्णींशी पुन्हा जोडला गेलो. त्यांच्यामुळे माझी जीवनशैली आमूलाग्र बदलून गेली.

कोरोनानंतर वेग घेत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील चित्रपट निर्मितीबद्दल आपल्याला काय वाटतं?

गुप्ते : हा प्रौढांचा चित्रपट आहे. हिंसा, शिव्या, गुन्हेगारी, भडकपणा.. ते सारं समाजाची आणि कुटुंबातील शांती भंग करणारं आहे. मी मुलांच्या चित्रपट चळवळीचा कार्यकर्ता आहे. मुलांसाठी हा प्लॅटफॉर्म नाही. मुलं ही कुटुंबाच्या फ्रेममध्ये खालच्या स्तरावर आहेत. त्यांच्या पातळीवर जाणीवपूर्वक कॅमेरा आणावा लागतो. शूटिंगमुळे मुलांची शाळा बुडता कामा नये, त्यांच्यावर अधिक तासांचे काम लादू नये यासाठी आग्रही असतो. ओटीटी प्रौढांचा प्लॅटफॉर्म आहे, मुलांसाठी नाही. मी मुलांमध्ये अधिकाधिक रमतो, त्यांच्याकडून शिकतो. प्रौढांच्या विश्वात बाजारूपणा असतो. मला तिथे घुसमटायला होतं.

"सायना' हा तुमचा बायोपिक नुकताच गाजला..

गुप्ते : माझ्यासाठी तीदेखील छोट्या मुलीची गोष्ट आहे. मीच लिहिली ती. त्यात काहीतरी मसाला घालून चटकपटक बनवणं, वाद निर्माण करून तिच्या यशावर शिंतोडे उडवण्याचे मी कधीही करत नाही. हे म्हणजे चित्रपट नाही. चित्रपट हा देखील त्या व्यक्तीच्या यशाचे सेलिब्रेशन असू शकते. तिच्या पालकांच्या कष्टाचे अप्रेसिएशन आहे, सेलिब्रेशन आहे. ती प्रेरणा देणारी कथा ठरावी, वाद निर्माण करणारी नसावी असे मी मानतो.

असा वेगळा विचार करून तुम्ही बॉलीवूडमध्ये कसे?
गुप्ते :
मी बॉलीवूडमध्ये नाही. बॉलीवूडच्या बाहेरचा आहे. माझ्या कलेवर, कौशल्यावर विश्वास असलेले काहीजण मला भूमिका देतात, दिग्दर्शन, पटकथा लेखनाचे काम देतात. ते मी करतो. पण बॉलीवूडमध्ये चित्रपटकलेची घसरण झाली आहे, मूल्यांपासून ते दूर गेलं आहे हे निश्चित. स्वातंत्र्यपूर्व काळात, त्यानंतरच्या एक-दोन दशकात याच भारतीय प्रेक्षकाने उच्च दर्जाचे चित्रपट पाहिले होते.

पण स्वातंत्र्यानंतर कमी वेळेत पैसे कमवणे ही वृत्ती यात घुसल्याने हिंदी सिनेमा कलेच्या मूल्यांपासून दूर गेला. ‘प्यासा’मधील कविमनाचा विजय सगळे विसरले आणि स्मगलर विजय प्रसिद्ध झाला. मोगॅम्बोसारखे खलनायक आपण सेलिब्रेट करू लागलो. आक्रोश, अर्धसत्य, मीर्च मसाला यातील खलनायकांचा नायक असलेल्या खलनायकाचा इतिहास लिहिला गेला नाही.

मराठीत मात्र तशी परिस्थिती नाही. नागराज मंजुळे, अविनाश अरुण यांच्यासारखे अनेक चित्रपट निर्माते अत्यंत चांगले काम करीत आहेत. चैतन्य ताम्हाणेचे चित्रपट म्हणजे गर्वाचीच गोष्ट आहे. मराठी मातीत, बंगाली मातीत चित्रपट संस्कृती रुजलेली आहे. टिकलेली आहे. ती हिंदीप्रमाणे बाजारू झालेली नाही.

अभिनेता, पटकथाकार, दिग्दर्शन... तुम्हाला सर्वाधिक भावणारी तुमची भूमिका कोणती?
गुप्ते : कलेचा विद्यार्थी ही. मी स्वत:ला चित्रपटकलेचा विद्यार्थी समजतो. एफटीआयमध्ये १२ वर्षे त्याचा अभ्यास करता आला. अनुभव घेता आला. अजूनही माझा अभ्यास सुरू आहे. सिनेमा ही अशी कला आहे की एकदा तिने तुमच्यावर गारुड केलं की त्यापासून सुटका अशक्य.

माझ्या वडिलांनी मला बोट धरून चित्रपट दाखवले, माझं बोट धरून माझा मुलगा चित्रपटाचा अभ्यास करतोय. “स्टॅनली का डब्बा’मध्ये त्याने अभिनय केला. त्यानंतरही काही चित्रपट आले, पण बॉलीवूडचं हे रूप बघून त्यानं ठरवलं, आपण अभिनेता व्हायचं नाही. तो जागतिक सिनेमाचा अभ्यास करतोय.

‘तारे जमीं पर...’ चित्रपटाबद्दल तुमच्यात आणि आमीर खानमध्ये मतभेद झाले होते...
गुप्ते :
मी मुलांसोबत काम करणाऱ्या अनेक संस्थांसोबत जोडलेला आहे. डिस्लेक्सिया हा आजार नाही, हे मुलांमधील वेगळेपण आहे. मात्र, सुपरस्टार आमीर यांना चित्रपटापेक्षा आपली भूमिका प्रभावशाली वाटली. त्यामुळे त्यात बदल केला. लोकांना तो उत्तम सिनेमा वाटतो. पण माझ्या दृष्टिकोनातून ताे तितकासा खरा उतरलेला नाही. चित्रपटाची कथा ऐकताना आमीरही रडला होता. पण त्याने नंतर जे बदल केले त्यावेळी मी गप्प राहिलो. खरं तर त्याचवेळी मी बोलायला हवं होतं. पण ते झाले नाही म्हणून आता ते बाेलताेय.

सध्या कशावर काम करता आहात?
गुप्ते :
‘सायना’ बघितल्यावर अॅमेझॉन ओरिजनलने मला संपर्क केलाय. कॅन्सर सरव्हायव्हल मुलावर हा चित्रपट आहे. त्याची पूर्ण कथा लिहूनही तयार झाली. पहिल्यांदाच मी प्रत्यक्ष लिहिले. स्मार्ट फोनमुळे! डोळ्यांच्या आजारामुळे मी अनेक वर्षे कथा सांगत असे आणि मदतनीस ती लिहिण्याचं काम करत. आता लवकरच त्या सिनेमाचं काम सुरू होईल.

बातम्या आणखी आहेत...