आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:पालिका निवडणुकीच्या भवितव्याचा आज अंतिम फैसला; सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता अधिक

नाशिक21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारने विधिमंडळात विशेष कायदा पारित करून राज्यातील १८ महापालिकांकरिता तयार केलेली प्रारूप प्रभागरचना रद्द करून नव्याने प्रक्रिया करण्याबाबत स्वत:कडे घेतलेल्या अधिकाराच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात बुधवारी अर्थातच ४ मे रोजी महत्त्वाची सुनावणी होणार आहे. पावसाळापूर्व निवडणुका घेण्याच्या दृष्टीने गेल्याच सुनावणीत अंतिम निर्णय होणे अपेक्षित होते मात्र, तसे न झाल्यामुळे किंबहुना निवडणूक आयोगानेही कथितरित्या प्रतिज्ञापत्राद्वारे पावसाळ्यात निवडणुका घेता येणार नाही असे स्पष्ट केल्यामुळे नेमके काय होते हे बघणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, नाशकात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसाधारणपणे सत्तेच्या विरोधात येणारा कौल बघता निवडणुका लांबणीवर पडतील, अशा भ्रमात राहू नका असे सांगितल्यामुळे उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

१४ मार्च रोजी नाशिक महापालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक कार्यकाळाची मुदत संपली. याचदरम्यान राज्यातील अन्य १८ महापालिकांची मुदतही संपत असल्यामुळे एकाचवेळी राज्य निवडणूक आयोगाने सर्वच महापालिका निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू केली. त्यानुसार प्रारूप प्रभागरचना अंतिम टप्प्यात म्हणजेच केवळ जाहीर करणे बाकी असतानाच राज्य शासनाने त्यास स्थगिती दिली.

त्याविरोधात सर्वोच्च न्यायायात प्रथम सात व आता जवळपास १२ याचिका दाखल असून त्यावर ७ एप्रिल रोजी सुनावणी होऊन पुढील तारीख २१ एप्रिल रोजी देण्यात आली. मात्र, या दिवशी सुनावणी न झाल्यामुळे २५ एप्रिल रोजी पुढील सुनावणी झाली. राज्य शासनाने आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे मांडल्यामुळे २५ एप्रिल रोजी निर्णय येईल, अशी अपेक्षा होती मात्र, या दिवशी निर्णय न होता पुढील तारीख ४ मे रोजीची दिली गेली. त्यानुसार आज सुनावणी होणार असून त्यात काय होते याकडे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...