आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राज्यातील 33 वसतिगृहांसाठी समाजकल्याण विभागाकडून आर्थिक तरतूद; वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी 7 कोटी 50 लाखांचा निधी

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील शासकीय वसतिगृहांतून हजारो विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय झाली आहे. समाजकल्याण विभागामार्फत राज्यात एकूण ४४१ शासकीय वसतिगृहे चालवली जातात. या सर्व वसतिगृहांतून विद्यार्थ्यांना दर्जेदार सोयी सुविधा व अभ्यासास पूरक वातावरण तयार व्हावे, यासाठी विभागाने सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यातूनच राज्यातील ३३ वसतिगृहांच्या दुरुस्तीसाठी प्रस्तावित केलेल्या कामांना मंजुरी मिळाली असून त्यासाठी ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

राज्याचे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यातील सर्व वसतिगृहांचे बांधकाम संदर्भात नुकतीच ऑनलाइन आढावा बैठक आयोजित करण्यात आली. त्यात मुंबई विभागास १.८१ कोटी, लातूर विभाग १.३२ कोटी, अमरावती विभाग २.७८ कोटी, पुणे विभाग १.२३ कोटी, नाशिक विभागास २४ लाख ७२ हजार, नागपूर विभाग २ लाख ४० हजार, औरंगाबाद विभाग ७ लाख ८७ हजार याप्रमाणे एकूण ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या निधीतून वसतिगृहांची विविध दुरुस्ती कामे, कपाटे अद्ययावत करणे, इमारत रंगरंगाेटी करणे, कोटिंग करणे, संरक्षण भिंत उभारणे, शौचालय, बाथरुम, खिडक्या, दरवाजे, तारेचे कम्पाउंड, भिंतीची दुरुस्ती, ग्राउंड फ्लोरिंग, रोलिंग, पाण्याची टाकी, स्ट्रीट लाइट, पेव्हर ब्लॉक बसविणे, टाइल्स बदलविणे, वॉटर प्रूफिंग, ड्रेनेजलाइन दुरुस्ती करणे, बोअरवेल बांधकाम करणे अशी कामे करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी विशेषत: शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर म्हणून वसतिगृहांकडे बघितले जाते. राज्यातील विविध भागात असणाऱ्या वसतिगृहांतून अनेक नामवंत विद्यार्थी घडले आहेत.

एका अर्थाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाची वसतिगृहे ही केंद्र बनली आहेत. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे स्थान वसतिगृहांचे आहे. त्यामुळे शैक्षणिक विकासात महत्त्वाची भूमिका असलेल्या शासकीय वसतिगृहाच्या इमारतींच्या दुरुस्ती करून सर्व आवश्यक साेयी सुविधांसह विद्यार्थ्यांना निवासासाठी तसेच अभ्यासासाठी पूरक वातावरणामुळे उपलब्ध होणार आहे.

वसतिगृहांच्या दर्जासह गुणवत्ता वाढीस मदत
राज्यातील एकूण ४४१ शासकीय वसतिगृहांपैकी ३३ वसतिगृहांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव २०२१-२२ मध्ये प्राप्त झाले होते. त्यासंदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. समाज कल्याणमंत्री धनंजय मुंडे, सचिव सुमंत भांगे यांच्या पुढाकाराने ७ कोटी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून वसतिगृहांचा दर्जा अधिक उंचावण्याबरोबरच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ होण्यास मदत होणार आहे.
-डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण

बातम्या आणखी आहेत...