आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील वडाळागाव येथील महेबूबनगर, रहेमतनगर व सादिकनगर भागात तांत्रिक बाबींमुळे वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत हाेताे. वडाळागावात ऐन पावसाळ्यात पाणी मिळत नसल्याच्या वाढत्या तक्रारींमुळे या भागात असल्याने पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून टँकरमार्फत पाणीपुरवठा केला जातोय. त्यात जलवाहिनी न टाकता थेट रस्ता काँक्रिटीकरणाला सुरुवात केल्याने स्थानिकांकडून या कामांचा विरोध केला जात आहे. ‘आधी पिण्यासाठी पाणी द्या, मग कोट्यवधीचे रस्ते बनवा’ अशी मागणी स्थानिकांकडून महापालिकेकडे करण्यात आली आहे.
शहरात पाऊस सुरू असताना तसेच धरणात पाणीसाठा वाढलेला असतानाही डीजीपीनगर ते थेट वडाळागाव तसेच अण्णा भाऊ साठे वसाहतीपर्यंत गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीपुरवठा व्यवस्थित होत नसल्याचे चित्र आहे. वडाळागावातील अनेक भागांत असाच प्रकार सुरू असून अनेक कुटुंबांना पाणी मिळत नसल्याने काही ठिकाणी नागरिक व माजी नगरसेवकांच्या तक्रारीवरून टँकरने पाणीपुरवठाही केला जात आहे. वडाळागावातील महेबूबनगर, सादिकनगर, गुलशननगर, मदारनगर, साठेनगर, सेंट सादिक स्कूल परिसरासह अर्ध्या वडाळागावात पाणीपुरवठा हाेत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्यात नवीन जलवाहिनी न टाकता पालिकेकडून नवीन रस्ता तयार केला जात आहे. याला स्थानिकांकडून विरोध केला जात आहे.
तर काम बंद पाडणार
काही महिन्यांपासून महेबूबनगर,रहेमतनगर आणि सादिकनगर भागात पाण्याची समस्या असताना याकडे दुर्लक्ष करत पालिकेकडून या भागात रस्ते काँक्रिटीकरण सुरू करण्यात आले आहे. काँक्रिटीकरणाआधी जलवाहिनी न टाकल्यास ही कामे बंद पाडण्याचा इशारा स्थानिकांकडून देण्यात आला आहे.
पुन्हा रस्ते खोदणार का?
महेबूबनगर, रहेमतनगर व सादिकनगर भागात पाण्याची समस्या आहे. या भागासाठी जलवाहिनी मंजूर केलेली असूनही ती न टाकता आता थेट रस्त्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर जलवाहिनीसाठी पुन्हा रस्ता खोदणार का?
माजिद शेख, स्थानिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.