आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक नाले गिळंकृत करणारे होणार गजाआड:नाशिकमध्ये एमआरटीपी अ‍ॅक्टद्वारे पहिला गुन्हा, पालिकेची धडक कारवाई

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
म्हसरूळ शिवारातील सर्व्हे ७१ मधील वरवंडी भागात नैसर्गिक नाला सिमेंटचे पाइप टाकून बंदिस्त करण्याचा प्रकार असा सुरु होता. याप्रकरणी बांधकाम करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - Divya Marathi
म्हसरूळ शिवारातील सर्व्हे ७१ मधील वरवंडी भागात नैसर्गिक नाला सिमेंटचे पाइप टाकून बंदिस्त करण्याचा प्रकार असा सुरु होता. याप्रकरणी बांधकाम करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नैसर्गिक नाले बुजवून त्यावर गगनचुंबी इमारतींचे इमले बांधणाऱ्या विकसकांना पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक महापालिकेने दणका दिला आहे. एमआटीपी अर्थातच महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ अंतर्गत पहिला गुन्हा म्हसरूळ शिवारातील सर्व्हे क्रमांक ७१ मधील वरवंडी भागात दाखल झाला आहे. ५० वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने नैसर्गिक नाले बंदिस्त केल्यामुळे मुंबईत २००६ च्या सुमारास उद्भलेल्या पूर परिस्थितीचा अभ्यास असल्यामुळे हे प्रकरण महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी गांभीर्याने हाताळले.

दरम्यान, या प्रकरणात फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिस ठाण्यात जामीन मिळत नसल्यामुळे जेलची वारी अपरिहार्य मानली जात आहे. त्यामुळे भविष्यात अशा पद्धतीने नाले बंदिस्त करणारे किंवा यापूर्वी ज्यांनी उपद‌्व्याप केले, त्यांच्यावर पालिकेने वक्रनजर केंद्रित केली आहे.

नाशिक शहरात गेल्या काही वर्षात मोठमोठी बांधकामे करताना नैसर्गिक नाल्यांचे पात्र बुजवले गेले. किंबहुना काही ठिकाणी नाल्यालगत बांधकामे करताना भराव टाकल्यामुळे पात्र संकुचित झाले. काळाच्या ओघात काही नाले तर अक्षरश: गायब झाले. हे सर्व नाले पावसाळ्यात पुन्हा मोकळे होऊन थेट घरात पाणी जाण्याचे प्रकार होत आहेत. विकसक बांधकाम करून मोकळा होत असून भविष्यात त्याचा फटका रहिवाशांना बसत आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेत वॉर्ड ऑफिसर ते सहआयुक्त असा काम करण्याचा अनुभव असल्यामुळे आयुक्त पवार यांनी शहरातील नैसर्गिक नाल्यांचा आढावा घेतला. त्यात परस्पर नैसर्गिक नाले सिमेंटचे पाइप टाकून बंदिस्त करण्याचा प्रकार समोर आल्यास एमआरटीपीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र नगररचना विभागात वर्षानुवर्षे काम करणारे अधिकारी त्यासाठी धजावत नव्हते. अशातच म्हसरूळ शिवारातील प्रकरण समोर आल्यावर आयुक्त पवार यांनी तत्काळ आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार शाखा अभियंता पंकज बाप्ते यांनी फिर्याद दिल्यानंतर मिळकतधारक असलेले तिवारी व अग्रवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जात आहे.

पुराबाबत नाशिकची मुंबई व्हायला नको

पन्नास वर्षांपूर्वी मुंबईत अशाच पद्धतीने नैसर्गिक नाले बंदिस्त केल्यामुळे आज पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो. सुदैवाने नाशिकमध्ये अद्याप अनेक नैसर्गिक नाले कार्यरत आहेत, मात्र ते बुजवले गेले तर पूरपरिस्थितीबाबत नाशिकची मुंबई व्हायला वेळ लागणार नाही म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात थेट तुरुंगात पाठवण्याची तरतूद आहे. - रमेश पवार, आयुक्त

गुन्हा, जेलवारीमुळे लागणार लगाम; पाच वर्षे शिक्षेची तरतूद
महापालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण किंबहुना अशा पद्धतीने नैसर्गिक नाले बंदिस्त करण्याचे प्रकार वाढले आहेत. वास्तविक अशा बेकायदेशीर कामांविरोधात कठोर कारवाईची तरतूद असून त्याचा वापर होत नव्हता. ही बाब लक्षात घेत पवार यांनी असे प्रकार आढळल्यास प्रथम पोलिस ठाण्यात फिर्याद, त्यानंतर लगेचच पालिका व पोलिसांमार्फत संयुक्त पंचनामा, संबंधितास अटक व पुढे न्यायालयीन कारवाईसाठी पाठवण्याचा पायंडाच पाडला आहे. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांना लगाम लागणार आहे. अशा प्रकरणात एक वर्ष किंवा पाच वर्षे शिक्षेची तरतूद आहे.

बातम्या आणखी आहेत...