आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एकीकडे कांदा उत्पादकांकडून निर्यात खुली करण्यासाठी आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. मात्र, भारतासमोर आता कंटेनर टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. कंटेनर उपलब्ध नसल्याने कृषीमाल निर्यात करण्यासाठी निर्यातदारांना प्रचंड अडचणी येत आहेत. ज्या निर्यातदारांना २० कंटेनर हवे आहेत त्यांना केवळ २ ते ३ कंटेनर उपलब्ध होत असून त्याचे भाडेही दुप्पट दराने अदा करावे लागत आहे. कंटेनरची स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागणार असल्याचे मुंबई येथील कोटक लाॅजिस्टिक अँड शिंपिंग कंपनीचे अभिषेक कोटक यांनी सांगितले.
कांदा, द्राक्ष, भाजीपाल्यासह शेतीमाल देशाबाहेर निर्यात होतो. मात्र, मुंबई बंदरात मालवाहतूक करणाऱ्या कंटेनरचा तुटवडा भासत असल्याने निर्यातीवर परिणाम होऊन त्याचा दरावर परिणाम होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परदेशात गेलेले कंटेनर क्लिअर होण्यासाठी आता पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागतो, पूर्वी त्याला फक्त ३ ते ४ तासांचा वेळ लागत होता. तसेच परदेशातून आयात होणाऱ्या मालाची टक्केवारी अवघ्या ३० टक्क्यांवर आल्याने कंटेनरदेखील उपलब्ध होत नसल्याने भारतातील शेतीमाल तसाच पडून राहत आहे. याचा फटका थेट निर्यातदारांना बसत आहे, तर अप्रत्यक्ष तो शेतकऱ्यांना बसू लागला आहे. निर्यात वेळेवर होणार नसेल तर व्यापारी शेतीमाल खरेदी करणार नाही. त्यामुळे पुन्हा शेतीमालाचे दर घसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चीनमधील शांघाय आणि सेंडोंग या शहरांमध्ये भारतातील किमान साडेचार ते पाच हजार कंटेनर अडकून पडले आहेत. कोरोनापूर्वी चीनमध्ये एक कंटेनर रिकामा होण्यासाठी तीन ते चार तासांचा अवधी लागत होता. आता एक कंटेनर रिकामा होण्यासाठी किमान १५ ते २० दिवस लागत आहेत.
कंटेनर भाड्यामध्ये दुप्पट ते अडीचपट वाढ : परदेशातून सध्या २८ टक्के आयात होत असल्याने बाहेरील देशातील कंटेनरदेखील भारतामध्ये येत नाहीत. भारतातील कंटेनर देशाबाहेर गेल्याने रोटेशन पूर्ण होत नाही. कंटेनरचा मोठा तुटवडा भासत असल्याने वाहतूक भाड्यामध्ये दुप्पट ते अडीचपट अधिक भाडे वाढले आहे. पूर्वी चीनसाठी ४०० डाॅलर वाहतूक भाडे लागत होते, तेच भाडे आता ८०० ते १ हजार डाॅलर झाले आहे. ही स्थिती पूर्वपदावर येण्यासाठी १ वर्ष लागण्याची शक्यता असल्याचे कोटक लाॅजिस्टिक अँड शिंपिंगचे अभिषेक कोटक यांनी सांगितले.
दरवाढ कमी करावी : शिपिंग कंपनीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची भाडे दरवाढ करू नये, जेणेकरून निर्यातीवर परिणाम होऊ शकतो. उलट निर्यात वाढण्यासाठी भाडे दरवाढ कमी करावी.- विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी
चीन आणि पाकिस्तान साधणार डाव : भारतातून निर्यात कमी झाल्यानंतर भारतीय विक्रेत्यांचे ग्राहक आपोआप कमी होणार आहेत. याचा लाभ हा चीन आणि पाकिस्तानी विक्रेते घेणार आहेत. केंद्र सरकारने शिपिंग कंपन्यांना लवकरात लवकर कंटेनर उपलब्ध होऊ शकतील,असे कांदा निर्यातदार विकास सिंग यांनी सांगितले आहे.
निर्यातीवर होणार परिणाम
कंटेनरचा तुटवडा भासत असल्याने भाडेवाढ झाली आहे. पुन्हा १ जानेवारीपासून भाडे दरवाढ होण्याची शक्यता आहे. जे निर्यातदार नेहमी निर्यात करतात त्यांनादेखील कंटेनर मिळत नाही. नवीन निर्यातदार आहेत, त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. निर्यात होत नसल्याने देशातील कृषीमालाच्या दरांवर त्याचा परिणाम होणार आहे. राजाराम सांगळे, सांगळे अॅग्रो
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.