आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:अखेर मादी बिबट्याने चार बछड्यांना नेले मूळ अधिवासात, प्रसूतीच्या दुसऱ्या दिवसापासून ते बछड्यांना मूळ अधिवासात नेईपर्यंत इको एको संस्थेकडून चित्रीकरण

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 16 ऑगस्ट ते 22 ऑगस्टपर्यंत मादी बछड्यांजवळ येऊन त्यांना दूध पाजणे, त्यांना चाटणे, त्यांच्यासोबत झोपणे हे दृश्य चित्रीत

बछड्यांना दूध पाजणे, त्यांच्यासोबत खेळणे, सुरक्षितता म्हणून रात्रभर त्यांच्याजवळ झोपणे आणि सकाळी निघून जाणे, तसेच अधूनमधून त्यांना भेटायला येणे, त्यांची सुरक्षा महत्त्वाची म्हणून एकाच ठिकाणी आठ ते पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ न थांबणे या नैसर्गिक नियमांचे पालन करून सक्षम होत असलेल्या पिलांना आपल्या तोंडात पकडून मूळ अधिवासात घेऊन जाण्याच्या घटनेचे दृश्य इगतपुरी तालुक्यातील नांदगावसदो येथे इको एको संस्थेने कॅमेऱ्यात टिपले असून हा विलक्षण अनुभव असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष वैभव भोगले यांनी दिली.

नांदगावसदो गावापासून दीड ते दोन किलोमीटरवर राजेंद्र तांदळे या शेतकऱ्याच्या पडवीमध्ये एका मादी बिबट्याने १४ ऑगस्ट रोजी चार बछड्यांना जन्म दिला होता. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तांदळे यांचे मळ्यात जाणे येणे कमी होते. एक दिवस मळ्यात गेल्यानंतर त्यांना चार बछडे दिसले. सुदैवाने यावेळी मादी बिबट्या परिसरात नसल्याने तांदळे यांनी धूम ठोकत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे आणि वनपाल पोपटराव डांगे यांनी इको एको संस्थेचे अध्यक्ष वैभव भोगले यांना सांगितले. वनविभाग आणि संस्थेने या पडवीत पाहणी केली. त्यावेळी परिस्थिती लक्षात घेऊन बछडे, मादी आणि मनुष्य या तिघांपैकी कोणालाही धोका नको याची काळजी घेतली. या ठिकाणी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दोन एमआय ३६० डिग्रीचे कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून मोबाइलवर सर्व चित्रीकरण दिसत होते.

१६ ऑगस्ट ते २२ ऑगस्टपर्यंत बिबट्या मादी बछड्यांजवळ येऊन त्यांना दूध पाजणे, त्यांना चाटणे, त्यांच्यासोबत झोपणे हे दृश्य चित्रीत झाले. २२ ऑगस्ट रोजी मादीने एक-एक बछडा तोंडात पकडून आपल्या मूळ अधिवासात घेऊन गेली. त्यानंतरही या ठिकाणी एक आठवडाभर कॅमेरे तसेच ठेवण्यात आले होते. यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वनपाल पोपटराव डांगे, के. के. हिरे, सुरेखा गुन्हाडे, मंगला धादवड, पी. एन. करवदे, निवृत्ती मेंगाळ, मुज्जूभाई आणि इको एको संस्थेचे वैभव भोगले, अरुण अय्यर, सागर पाटील यांनी बिबट्या आणि बछडे यांना मूळ अधिवासात नेण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

बछडे सातव्या महिन्यापासून शिकारीला करतात सुरुवात

मादीने बछड्यांना जन्म घातल्यानंतर सहा ते सात तासांनंतर त्यांचे डोळे उघडतात. तसेच पंधरा ते वीस दिवसात ते चालू लागतात. तसेच सात ते आठ महिन्यांनंतर हे बछडे लहान प्रमाणात शिकारीचा सराव करतात. तोपर्यंत ते मादीच्या अंगावरच दूध पितात. बछड्यांना जन्म दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षेसाठी मादी अधिक आक्रमक असते.

आठ दिवसांनंतर स्थलांतर

बिबट्या मांजर कुळातील असून सर्वात हुशार वन्यप्राणी आहे. आपल्या आणि बछड्यांच्या सुरक्षेसाठी तर आठ ते पंधरा दिवसांनंतर ते स्थलांतर करीत असतात. त्याचप्रमाणे या मादीनेदेखील बछड्यांना जन्म दिल्यानंतर पंधरा दिवसांत दुसऱ्या सुरक्षितस्थळी हलविले असणार किंवा सोबत ठेवले असणार असे सेवानिवृत्त उपवनसंरक्षक श्याम रनाळकर यांनी सांगितले.

पावसामध्येही वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा

बिबट्याला आणि त्यांच्या बछड्यांना पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यामुळे दोघांनाही धोका असतो. परंतु, नांदगावसदोच्या नागरिकांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने एकही नागरिक या शेताकडे गेला नाही. तसेच या बछड्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाचे कर्मचारी भरपावसामध्येही बंदोबस्त करीत होते. ज्या नागरिकांना वन्यजीवांबाबत जनजागृती किंवा मदत लागत असेल त्यांनी ७२७६१५६६५६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन इको एको संस्थेचे वैभव भोगले यांनी केले आहे.

रात्रभर बछड्यांजवळ

बिबट्या मादीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी रात्रभर जागरण करून देखरेख ठेवली. या दृश्यामध्ये मादी ही बछड्यांजवळ दिवसातून तीन ते चार वेळा येताना दिसून आली. तसेच रात्रभर बछड्यांजवळ थांबून पहाटेच्या वेळी मादी निघून जाताना दिसल्याचे भोगले यांनी सांगितले.