आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबादास दानवेंचा टोला:सत्तारांच्या घरावर लागेल ‘माजी आमदार’ची पाटी, मोदींचा शिंदेंच्या पाठीवरील हात कधीही निघेल

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र माेदी हे खरेच बाेलले की शाॅर्टकट राजकारण्यांना निश्चितच जनता धडा शिकवेल. त्यानुसार आता राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या घरासमाेर ‘माजी आमदार’ ही पाटी निश्चितच लागेल, असा चिमटा विराेधी पक्षनेते तथा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी काढला. माेदी यांनी आता जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली असली तरी, पाठीवरचा हा हात कधी निघेल हे त्यांनाही समजणार नाही. ‘पाठीवर हात फिरवणारे आणि फिरवून घेणाऱ्यांना’ जनताच धडा शिकवेल, अशी टीकाही दानवे यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बाेलताना केली. ते म्हणाले की, शॉर्टकट राजकारण्यांना धडा शिकवा, हे मोदी खरे बोलले. गद्दारी करून सत्ता मिळवण्याचा शाॅर्टकट पॅटर्न राबविणाऱ्यांना जनता नक्कीच धडा शिकवेल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मिळाला. त्यातून केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या बटीक असल्यासारख्या वागत असल्याचे स्पष्ट हाेत आहे. सत्तेचा किती गैरवापर करायचा याचे हे उदाहरण असून संजय राऊत यांच्या जामिनातून आधीच ते स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयाेगाच्या भूमिकेबाबतच संशय
पक्ष चिन्हाच्या वादावर निवडणूक आयोगाकडे सुनावणी सुरू झाली आहे. मात्र, त्याबाबतही जनते संभ्रमाचे वातावरण आहे. या सर्व प्रक्रियेतच पक्षपातीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे. शिवसेना उद्वव बाळासाहेब ठाकरे गट उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली अविरत काम करत असून जनतेचे बळ त्यांच्यामागे आहे. त्यामुळे ही सुनावणी निवडणूक आयोग सोडून न्यायालयात झाली तर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शाईफेक झाली कशी हे शाेधा
भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेकीची घटना चुकीची आहे. मात्र हे कशामुळे झाले याचाही विचार होण्याची गरज आहे. या घटनेचा व्हिडिओ ज्या पत्रकाराने काढला त्याच्यावरही गुन्हा दाखल करणे चुकीचे असून माध्यमांनीच आता या सर्वांबाबत विचार करणे गरजेचे असल्याचे मत दानवे यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...