आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:बिबट्याच्या पिंजऱ्यात अडकला कोल्हा: मेल्याचे ढोंग, बाहेर काढताच ठोकली धूम

संपत ढोली | सिन्नर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांपासून सिन्नर तालुक्यात कोल्ह्यांचा सुळसुळाट

बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात कोल्हा अडकला. मात्र मेल्याचे ढोंग करून त्याने स्वतःची सुटका करून घेतली. तेव्हा ग्रामस्थ अवाक् होऊन पाहतच राहिले. बिबट्याला जे जमले नाही, ते कोल्ह्याने करून दाखवले. आणि कोल्ह्याच्या लबाडीने आपण कसे फसलो याची चर्चा करताना ग्रामस्थांची हसून पुरेवाट झाली. उजनी येथील या घटनेने लोकांचे मनोरंजन होत आहे.

बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने पाच दिवसांपूर्वी सुरसे वस्तीवर पिंजरा लावला. बिबट्या पिंजऱ्यात अडकण्यासाठी शेळीही ठेवण्यात आली. बिबट्या अडकण्याची वाट पाहणाऱ्या ग्रामस्थांना शुक्रवारी सकाळी नऊ वाजता पिंजऱ्याचे फाटक पडलेले दिसले. बिबट्या अडकला असावा असा विचार करून सीताराम आहेर, सुनील दवंगे, शरद सुरसे आदींनी पिंजऱ्याजवळ जाऊन पाहिले तर त्यात कोल्हा निपचित पडलेला दिसला. त्याला उठवण्यासाठी आरडाओरड करण्यात आली, खडेही मारून पाहिले. मात्र बराच वेळ झाला तरी कोल्हा जागचाही हलला नाही. तो नक्कीच मेला असावा असा अंदाज करून ग्रामस्थांनी त्याला पिंजऱ्याबाहेर काढले. तरीही तो जागचा हलत नव्हता. त्याच्या तोंडावर पाणी शिंपडले. त्यानंतरही किमान तो २० मिनिटे पडून राहिला. मात्र डोळे किलकिले करत कोल्हा उठला आणि त्याने विजेच्या चपळाईने जवळच उसाच्या शेतात धूम ठोकली.

.... आणि ग्रामस्थ पाहतच राहिले :

कोल्ह्याला पिंजऱ्याबाहेर काढल्यानंतर पाहण्यासाठी गर्दी जमली. निपचित पडलेल्या कोल्ह्याने थोडा वेळ जाऊ दिला. संधी पाहून धूम ठोकली. त्याच्या या कृतीने ग्रामस्थ अवाक् होऊन पाहत राहिले आणि नंतर कोल्ह्याने आपली कशी जिरवली याची चर्चा करत होते.

दोन वर्षांपासून सिन्नर तालुक्यात कोल्ह्यांचा सुळसुळाट

तालुक्यात दोन वर्षांपासून कोल्ह्यांची संख्या वाढण्याबरोबरच मानवी वस्तीत वर्दळही वाढली आहे. दीड वर्षापूर्वी देवपूर व दगडवाडी (गुळवंच) येथे मेंढ्यांवर कोल्ह्यांच्या कळपाने हल्ला केला होता. यात पशुपालकांचे मोठे नुकसान झाले होते. वावी, पंचाळे, शहा, देवपूर परिसरात कोल्हे कळपाने फिरताना आढळून येत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser