आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Fraudulent Attempt On Behalf Of The Commissioner By Sending A Message On A Mobile Phone Demanding Financial Assistance; Type In Nashik Municipal Corporation

आयुक्तांच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न:मोबाईलवर संदेश पाठवून आर्थिक मदतीची मागणी; नाशिक महापालिकेतील प्रकार

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुड डे, सध्या तुम्ही काय करत आहात? सध्या कोठे आहात?मी एका बैठकीत आहे मात्र या ठिकाणी मला फोन उचलता येत नाही.। कृपया मला पैसे हवेत. सायंकाळपर्यंत परत देतो असा संदेश पाठवून पालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. चंद्रकांत पलकुंडवार यांच्या नावाने फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला असून यासंदर्भात सायबर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे. सकाळी दहा वाजता पालिकेमध्ये बैठक सुरू असताना घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी आपल्याला आलेला संदेश आयुक्तांना दाखवल्यानंतर या फसवणुकीचा उलगडा झाला.

बुधवारी सकाळी पालिका आयुक्त डॉ. पुलकंडवार यांचा डीपी असलेल्या एका मोबाईल क्रमांकावरून अधिकाऱ्यांना आर्थिक मदतीबाबत संदेश सुरू झाले. हा क्रमांक अधिकाऱ्यांकडे सेव्ह नसल्यामुळे सर्वांनाच आता नेमके काय करायचे असा प्रश्न पडला. अशातच आयुक्त यांच्या दालनामध्ये 'हर घर तिरंगा' या मोहिमे संदर्भात बैठक सुरू झाली. यावेळी डॉ. पलोड यांनी हा संदेश दाखवल्यानंतर आयुक्तांना चांगलाच धक्का बसला. त्यानंतर हळूहळू प्रत्येक अधिकाऱ्याने पुढे येत आपल्याला अशाच पद्धतीचा संदेश आल्याचे दाखवले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत आयुक्तांनी तात्काळ पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांना संपर्क साधून या प्रकरणाची कल्पना दिली. तसेच पुलकुंडवार यांनी तात्काळ आपल्याशी संबंधित सर्व परिचितांना संदेश पाठवून माझ्या नावाने कोणीतरी फसवणूक करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यास प्रतिसाद देऊ नका असे कळवून फसवणुकीपासून अनेकांना रोखले.

'तो' मोबाईल क्रमांक मंचर मधील व्यक्तीचा

९८३४२४६२६३ या क्रमांकावर डॉ. पुलकुंडवार यांच्या नावाचा प्रोफाइल पिक्चर सेव्ह करून अधिकाऱ्यांना आर्थिक मदतीसाठी मेसेज करण्यात आले. हा व्यक्ती मंचर येथील एका व्यक्तीचा असून सर्च केल्यानंतर नाना गुंडा, राजेश कणसे अशा पद्धतीची वेगवेगळी नावे येत आहेत. दरम्यान आयुक्तांनी माझा कार्यालयीन कामासाठी ९७०२१०००५६ हा फक्त एकच नंबर असून कृपया अन्य नंबर वर कोणीही संपर्क साधू नये असे आवाहन केले आहे.

भूलथापांना कोणीही बळी पडू नये

नाशिक महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियाद्वारे विविध क्लूप्त्या लढवून फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. माझ्याबाबत देखील आज असाच प्रकार घडल्याचे लक्षात आले. मात्र मी तात्काळ सर्वांना संपर्क साधून सजग केले. रीतसर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दाखल केली आहे. सर्वांनी दक्ष राहून भूलथापांना बळी पडू नये.

बातम्या आणखी आहेत...