आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थंडी:महाराष्ट्रात थंडीमध्ये सलग चढउतार; दोन दिवस राज्य पुन्हा गारठणार, विदर्भात वादळवाऱ्यासह गारपीट व पावसाची शक्यता

नाशिक4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१५ दिवसांपासून अफगाणिस्तानातून येणाऱ्या पश्चिमी चक्रावातामुळे उत्तर भारत व महाराष्ट्रात थंडी आहे. २९ जानेवारीनंतर २ फेब्रुवारीला आलेल्या चक्रावातामुळे उत्तर भारतात पाऊस, गारपीट, धुके व थंडी असे वातावरण सुरू आहे. महाराष्ट्रातही गुरुवारी किमान तापमान वाढले होते. कमाल तापमान काही अंशी सरासरीच्या तुलनेत घसरले होते. भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अगदी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. या बदलांच्या पार्श्वभूमीवर आगामी २ दिवस वातावरणात पुन्हा गारवा जाणवणार आहे.

यंदा सलग पश्चिमी चक्रावात येत आहेत. त्यामुळे उत्तर भारत, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात थंडीमध्ये सलग चढउतार जाणवत आहे. २९ जानेवारीच्या चक्रावातामुळे जम्मू-काश्मिरात हिमवृष्टी झाली. त्या भागातून येणाऱ्या वाऱ्यामुळे राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र गारठला आहे. बुधवार आणि गुरुवारी थंडीचे प्रमाण कमी झाले असले तरी गुरुवारी सायंकाळी वातावरणात गार वारे वाहत असल्याने थंडी वाढली होती. तसेच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणातही किमान तापमानात घसरण होऊन गारठा वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्राकडून वाहणारे वारे व बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या वाऱ्यांची झारखंडजवळ धडक होत आहे. यामुळे या परिसरासह विदर्भात वादळवाऱ्यासह विजांचा गडगडाट, गारपीट व पावसाची शक्यता आहे.

पुन्हा वाढणार गारवा : पश्चिमी चक्रावातामुळे उत्तर भारतात पाऊस, गारपीट, धुके आणि थंडी असे वातावरण आहे. त्यानंतर उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र गारठत आहे. २ फेब्रुवारीला आलेल्या चक्रावातामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि कोकणात थंडीमध्ये वाढ होणार आहे. त्यानंतर पुन्हा किमान तापमानात वाढ होऊन थंडी कमी होईल, असे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...