आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालयाची मेनराेड येथील इमारत धोकादायक झाल्याने हे कार्यालय बी. डी. भालेकर शाळेच्या इमारातीत स्थलांतरित करण्यात येणार आहे. मात्र, जुन्या इमारतीप्रमाणेच भालेकर शाळेचे छतच नव्हे तर संपूर्ण इमारतच धाेकादायक झाली आहे. या दुरुस्तीसाठी साधारण ४० लाख रुपये खर्चाचा अंदाज देण्यात आला असून हाच खर्च जुन्या इमारतीवरही केला तर तिथेही काम हाेऊ शकते किंवा एखादी नवीन इमारतही उभी राहू शकते. त्यामुळे या इमारतीचे स्थलांतर म्हणजे राेगापेक्षा इलाज भयंकर असाच हाेत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. जुनी महापालिका अशी ओळख असलेले मेनरोड येथील महापालिका इमारतीची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. ब्रिटिशकालीन इमारत सध्या धोकादायक स्थितीत आहे. मेनरोड येथील कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून कशाबशा पद्धतीने काम सुरू होते. २०१९ झालेल्या जोरदार पावसात या इमारतीची दुरवस्था झाली. महापालिकेची ही इमारत ब्रिटिशकालीन असल्यामुळे ती जीर्ण झाली आहे. या इमारतीचे संपूर्ण बांधकाम चुनखडीचा वापर करून दगडामध्ये केले आहे. इमारतीच्या देखभाल दुरुस्तीबाबत प्रशासनाने कधीही विशेष असे लक्ष दिले नाही. आता येथील दुर्घटना टाळण्यासाठी पूर्व विभागीय कार्यालय बी. डी. भालेकर शाळेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नुकत्याच झालेल्या पावसाने शाळेच्या इमारतीच्या जीर्ण अवस्थेची पाेलखाेल झाली. पूर्व विभागाच्या प्रशासन, उद्यान आणि अतिक्रमण विभाग पंडित कॉलनी येथील शिक्षण विभागाच्या कार्यालयात आहेत तर आरोग्य, जन्म-मृत्यू, विविध कर, पाणीपट्टी, घरपट्टी विभाग हे विभाग मेनरोडवरील जुन्या इमारतीत आहेत. त्यामुळे नागरिकांचे हाल हाेतात. आता विभागीय कार्यालय थेट पंडित कॉलनीत स्थलांतर करण्यात आल्याने नागरिकांची नाराजी आहे.
दुरुस्तीला चाळीस लाखांवर खर्च
बी. डी. भालेकर शाळेच्या इमारतीचे छत, दारे-खिडक्या आणि इतर दुरुस्तीला ४० लाखांवर खर्च येणार असल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनीच व्यक्त केला आहे. एवढ्याच खर्चात जुनी इमारतही दुरुस्त हाेऊ शकते किंवा नवी इमारतही उभी राहू शकते. तसे झाल्यास पूर्व विभागीय कार्यालयाला कायमस्वरूपी हक्काची इमारत मिळेल. तसेच, पूर्व विभागाचे विखुरलेले विविध विभाग एकाच छताखाली येतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.