आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन वाळू धोरणाची अंमलबजावणी प्रशासनाकडून सुरू झाली आहे. निविदा जाहीर केल्या असून पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील १३ घाटातून वाळू काढून ६ सरकारी डेपोत साठवण्यात येईल. १० मे पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन सर्वसामान्यांना ६०० रुपये ब्रासप्रमाणे वाळू उपलब्ध होईल. बीपीएल आणि सरकारी योजना घरकुलांसाठीच्या लाभधारकांना मोफत वाळू उपलब्ध होईल. केवळ डेपोपासून घरापर्यंत वाहतुकीचा खर्च त्यांना करावा लागणार आहे.
वाळू धोरण अंमलबजावणीसाठी महत्त्वाची बैठक बुधवारी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी रोहिणी चव्हाण उपस्थित होते. मालेगाव, कळवण, देवळा आणि बागलाण या तालुक्यांमधील वाळू घाटांचा समावेश आहे. मालेगाव तालुक्यातील पाच घाटांवर वाळूचा उपसा करण्यात येईल. सर्व १३ वाळू घाटांमधून ९० हजार ब्रास वाळू मिळणे अपेक्षित असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. वाळू घाटांपासून जवळच साठवणूक डेपो करण्यात येणार आहे. सहा डेपोची जागा प्रशासनाने निश्चित केली अाहे. वाहतुकीचा खर्च वाढू नये यासाठी वाळू घाटापासून जवळच हे डेपो राहतील, याचीही खबरदारी घेण्यात आली आहे. वाळू घाटांसाठी आजपासून निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून ९ मे रोजी या निविदा उघडण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्वसामान्यांना वाळू उपलब्ध होईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.