आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामीण भागातील गरीब होतकरू मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या वतीने ‘सुपर ५०’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत देशभरातील नामांकित आयआयटी संस्थांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या जेईई परीक्षेची तयारीसाठीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पंरतू केवळ ५० विद्यार्थ्यांपुरतीच ही याेजना मर्यादीत न ठेवता सर्वच स्तरांतील गरीब विद्यार्थ्यांचा या योजनेत सहभाग करत त्यांनाही लाभ देण्याची सूचना सभागृहात आमदार डाॅ. राहुुल आहेर यांनी मांडताच लागलीच पालकमंत्री दादा भुसे यांनीही पुढील वर्षापासून ५० वरून ही मर्यादा १०० केली जाईल, असे अश्वासन दिले.
जिल्हा नियोजन समितीची सोमवारी (दि. १२) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत विविध योजनांसाठी आमदारांकडून निधीची मागणी केली जात असताना यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आमिशा मित्तल यांनी सुपर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठीची सुपर-५० योजनेची माहिती दिली. देशभरातील नामांकित आयआयटी संस्थांमध्ये प्रवेशासाठी अपेक्षित मार्गदर्शन मिळावे हा या याेजनेचा उद्देश आहे.
त्यासाठी एससी, एसटी प्रवर्गातील ५० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. मोफत प्रशिक्षणासह निवासाची मोफत व्यवस्था करण्यात येणार असून हा संपूर्ण खर्च जिल्हा नियोजन समितीद्वारे केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर आ. डाॅ. आहेर यांनी या याेजनेची व्याप्ती वाढवावी, अशी सूचना केली. पालकमंत्री भुसे यांनी पुढील वर्षापासून त्यात वाढ करण्याचे आश्वासन दिले.
३६०० विद्यार्थ्यांतून केली ५० जणांची निवड
या योजनेंसाठी जिल्हाभरातून उमेदवारांची निवड करताना प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यासाठी ३६०० विद्यार्थ्यांनी नोंद केली. तर २२०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. त्यातून पहिल्या ५० जणांची निवड करण्यात आल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.
१५, १६ डिसेंबरला निविदा
या योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे जि. प. ला निधीचीही उपलब्धी करुन देण्यात आली आहे. शिवाय विद्यार्थ्यांची निवडही झाली असल्याने आता पुढील सोयीसुविधा अर्थात निवास, भोजन अन् इतर बाबींसाठी लागलीच १५ ते १६ डिसेंबरपर्यंत निविदा काढण्यात येतील. लागलीच विद्यार्थ्यांना प्रशिक्षणालाही सुरुवात केली जाणार आहे. - आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प., नाशिक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.