आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व पुरोहित संघाच्या वतीने गत ५० पेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेला गंगापूजनाचा सोहळा मोठ्या मंगलमय वातावरणात गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते रामकुंडावर पार पडला. शुक्रवारी (३ जून) या सोहळ्याने उपस्थितांना सिंहस्थ कुंभमेळ्याचीच आठवण करून दिली. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून दशमी असे १० दिवस भारतभर गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो. या वर्षी ३१ मे ते ९ जूनपर्यंत गंगा दशहरा उत्सव साजरा होत आहे.
याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, महापालिका आयुक्त रमेश पवार, वत्सला खैरे, महेश हिरे उपस्थित होते. या वेळी गुरुमाउली अण्णासाहेब मोरे म्हणाले की, भारतात नद्यांना आम्ही मातेचा सन्मान दिला आहे. नदी जीवसृष्टीला सजीवत्व देते. पवित्रता, शुद्धता, निर्मळता, प्रक्षालन, परिष्कार, संयम, परोपकार, पापमुक्ती या सर्वांचे प्रतीक आपण गंगा गोदामातेस मानतो. या मातेशी आपले मानसिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक दृढ भावबंध युगानुयुगे रुजले आहेत. म्हणूनच जीवसृष्टीला नवचैतन्य देणाऱ्या गंगा गोदावरीमातेचे पूजन करत सन्मान करत आहोत. पुरोहित संघाचे सतीश शुक्ल आणि सहकाऱ्यांनी राष्ट्रकल्याण, राष्ट्ररक्षण, सर्व जीवसृष्टीचे कल्याणाचे साकडे गुरुमाउली व उपस्थित सेवेकऱ्यांच्या वतीने गोदामाईस घातले. मंत्रघोषात गंगापूजन करण्यात आले. गोदामाईच्या माध्यमातून पर्जन्यराजाने कृपा करून सर्व जीवसृष्टीला नवचैतन्य द्यावे, शेतकरी सुखी, संपन्न व्हावा आणि शेतकरी राजाच्या आत्महत्या थांबाव्यात, अशी मनोकामना गोदामाईकडे व्यक्त करत आहोत, असे सांगत ती आपली हाक ऐकून निश्चितच आपली इच्छा पूर्ण करेल, असा विश्वास गुरुमाउलींनी व्यक्त केला.
कलश यात्रा, रांगोळ्यांनी लक्ष वेधले
दरवर्षीप्रमाणे गंगापूर रोड येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातून गंगाजल कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. भगवे ध्वज घेत महिला-पुरुष सेवेकरी स्वामीनामाचा जप करत रामकुंड परिसरात पोहोचून मुख्य गंगापूजन सोहळ्यात सहभागी झाले. यात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.