आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतेकडे दुर्लक्ष:सिडको प्रशासकीय कार्यालय परिसरात कचऱ्याचे साम्राज्य

सिडको9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको प्रशासकीय कार्यालय मागील १५ दिवसांपासून विविध विषयांमुळे चर्चेत आहे. नागरिकांचे प्रश्न सुटत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. लाखो रुपयांची उलाढाल हाेणाऱ्या या कार्यालयाचा परिसर मात्र कचराकुंडी बनले असून वाढलेले गाजर गवतामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे हे कार्यालय फक्त नागरिकांकडील वसुलीसाठीच आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

सिडको प्रशासकीय कार्यालयाचे वर्षभरापूर्वीच नूतनीकरण केले आहे. रंगरंगोटी व दुरुस्त्या करण्यात आल्या. कार्यालय चांगले करताना आजूबाजूचा परिसर स्वच्छ करणे अपेक्षित असताना त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कार्यालयाच्या आजूबाजूचा परिसर अस्वच्छतेने ग्रासला असून मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढले आहे.

सिडकोतील २ लाख नागरिकांना विविध कामांसाठी या कार्यालयात कधी ना कधी यावे लागते. असे असताना येथे योग्य त्या सुविधा मिळत तर नाहीच मात्र सर्वसामान्य नागरिकांनाही अस्वच्छतेशी सामना करावा लागतो. दररोज येथील कर्मचारी व आधिकारी यांनाही याचा त्रास होत असेलच! मग तरीही येथे स्वच्छता का होत नाही? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.

मनपाने यांनाही दंड करावा
नागरिकांच्या घराजवळ कचरा आढळला तर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दंड केला जाताे. तसेच या कार्यालयाला बेजबाबदार ठरवत त्यांच्यावरही कारवाई करायला हवी. - अॅड. सागर कडभाने, सामजिक कार्यकर्ते

फक्त वसुली कार्यालय
सिडको कार्यालयात नागरिकांची कामे होत नाहीत. कोणत्याही कामासाठी नागरिकांची अडवणूक होते. वसुलीसाठी सर्व सुरू असताना कार्यालय व आजूबाजूच्या अस्वच्छतेकडे लक्ष कसे देणार? - कैलास चुंबळे, सामजिक कार्यकर्ते

प्रशासकांपुढे बोलणार काय?
सद्यस्थितीत नाशिकमधील सिडको प्रशासक कांचन बोधले यांच्या सुरू असलेल्या मनमानीबाबत मुख्य प्रशासक दीपा मुधोळ-मुंडे यांच्यासमोर नागरिकांनी तक्रारी केल्या. एकीकडे फक्त त्यांची स्वतः चीच कॅबिन स्वच्छ असून कार्यालयात इतर ठिकाणी अस्वच्छता दिसून येत आहे. त्यांच्यापुढे काय बोलणार? असेही एका कर्मचाऱ्याने सांगितले. तर त्या भाजपच्या एका मोठ्या राजकीय व्यक्तीच्या नातेवाइक असल्याने कुणालाही जुमानत नसल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...