आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

83 लहान घंटगाड्या गृहीणींसाठी डाेकेदुखी:कचरा टाकण्यासाठी खुर्चीत चढण्याचा खटाटोप, 12 मीटर रस्त्यावरही लहानच गाड्या

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१७५ काेटी रूपयांचा घंटागाडीचा ठेका ३५४ काेटीवर गेल्यानंतर शहरात शंभर टक्के कचरा संकलन हाेवून स्वच्छ व सुंदर नाशिक हाेईल ही अपेक्षा दुसऱ्या दिवशी फाेल ठरली आहे. जवळपास सव्वाशे नवीन वाहनांची संख्या वाढवली असली तरी, त्यातील ८३ लहान घंटागाड्यांची लांबलचक उंची गृहीणींसाठी डाेकेदुखी बनली असून स्वत:ची खुर्ची घेवून त्यावर उभे राहील्यानंतर कचरा टाकण्याचा द्रविडी प्राणायम करावा लागत आहे.

धक्कादायक म्हणजे, गल्लीबाेळातील कचरा संकलनासाठी माेठ्या गाड्या जावू शकत नसल्यामुळे लहान गाड्या आणण्याची याेजना अंमलात आणली. प्रत्यक्षात या गाड्या १२ मीटर रूंद रस्त्यावरही फिरत असल्यामुळे हा खटाटाेप कशासाठी असा संतप्त प्रश्न आहे.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात जुन्या घंटागाड्याची मुदत संपली असल्यामुळे नवीन निविदेसाठी झटपट प्रक्रीया अपेक्षित हाेती मात्र नवीन निविदेची प्रक्रिया हाेऊन केवळ अभ्यासाच्यानावाखाली तब्बल तीन आयुक्तांनी एक वर्षाचा वेळ घेतला. बऱ्याच भवती न भवतीनंतर १ डिसेंबरपासून शहरात ३९६ घंटागाड्या सुरू झाल्या. यापुर्वीच्या ठेक्यात २७४ इतक्याच गाड्या हाेत्या.

आता, ८३ नवीन लहान गाड्यांची संख्या वाढवून गल्लीबाेळातील कचरा संकलनाचे नियाेजन हाेते. नवीन घंटागाडी सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी सगळ्यांकडूनच काेडकाैतुक झाले. दुसऱ्या दिवशी आता अडचणी समाेर येत आहे. प्रामुख्याने लहान घंटागाड्या या माेठ्या रस्त्यांवर येत असून या गाड्यांची कचरा साठवण्याची क्षमता व उंची डाेकेदुखी ठरली आहे. या गाड्या कमी वेळात भरल्या जात असून त्या रिकाम्या करून पुन्हा येणे अपेक्षित असताना ते हाेत नाही.

उंची अधिक असल्यामुळे अनेक महिलांना अक्षरश खुर्चीवर उभे राहून कचरा टाकावा लागत आहे. यापुर्वी माेठ्या घंटागाड्यावर किमान दाेन कर्मचारी व एक चालक हाेता. लहान गाड्यांवर एक चालक व एक कर्मचारी असणे अपेक्षित असताना केवळ चालकाच्या भरवशावर गाड्या कचरा संकलीत असल्यामुळे नागरिकांची गैरसाेय हाेत अाहे.

दंडही नाही व घंटागाड्या किती धावल्या?

पहिल्या व दुसऱ्या दिवशी ३९६ घंटागाड्यापैकी प्रत्येक विभागात किती घंटागाड्या गेल्या, त्यांनी किती फेऱ्या व किती कचरा संकलन केले याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे नाही. गेल्यावेळी पहिल्या दिवसापासून ठेक्यातील अटीशर्थीत नमुद असलेल्या संख्येप्रमाणे घंटागाड्या नसल्यास दंडात्मक कारवाई हाेत हाेती. यंदा मात्र, तसे न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त हाेत आहे. दरम्यान, ठेकेदारांना नियाेजनासाठी संधी देण्याकरीता एक महिना दंडात्मक कारवाई न करता सर्व ऑपरेशन सुरळीत केले जाईल व त्यानंतर बेशिस्तपणा करणाऱ्यांवर कठाेर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डाॅ. आवेष पलाेड यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...