आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:गेवराईच्या डॉक्टरचा नाशिकच्या महाविद्यालयात संशयास्पद मृत्यू; रॅगिंग, घातपात झाल्याचा कुटुंबीयांकडून आरोप

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

आडगाव येथील मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेच्या डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी.गायनॅकचे पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या देवपिंप्री (ता. गेवराई, जि. बीड) येथील डॉ. स्वप्निल शिंदे (२६) यांचा रुग्णालयाच्या आवारात अकस्मात मृत्यू झाला. डॉ. स्वप्निल यांच्या कुटुंबीयांनी महाविद्यालयातील दोन वरिष्ठ महिला डॉक्टर आणि व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचा आरोप करत एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस आयुक्तांकडे केली. कुटुंबीयांनी आडगाव पाेलिस ठाणे, जिल्हा रुग्णालय आणि आयुक्तालय असे वेगवेगळ्या ठिकाणी दिवसभर आंदोलन केले.

दरम्यान, दोन वरिष्ठ महिला डॉक्टरांनी वर्षभरापासून रॅगिंग केल्यानेच त्याने हे पाऊल उचलत आत्महत्या केल्याचा आरोप स्वप्निलचे वडील महारुद्र शिंदे व नातेवाईक डॉ. कृष्णा राक्षे, राहुल राक्षे यांनी केला. या प्रकरणी वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व जबाबदार आरोपींविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी शिंदे कुटुंबीयांनी केली. यात चौघांची नावे घेण्यात आली आहेत.

सुवर्णपदक विजेता विद्यार्थी मानसिक रुग्ण कसा?
स्वप्निल हा कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूटचा एमबीबीएसमध्ये सुवर्णपदक विजेता विद्यार्थी हाेता. त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञाचे उपचार सुरू असल्याचे कॉलेज व्यवस्थापन सांगते ते दुर्दैवी आहे. स्वप्निलची बॅग, कागदपत्रे कॉलेजने ताब्यात घेतली. त्याचा माेबाइलदेखील चक्क चार तासांनी नातलगांकडे दिला. हा प्रकार संशयास्पद आहे. रॅगिंग झाल्यानेच स्वप्निलने आत्महत्या केल्याचा संशय आहे. - महारुद्र शिंदे, वडील, डॉ. कृष्णा राक्षे, नातलग

पाच महिन्यांपासून तणावात
डॉ. स्वप्निल पाच महिन्यांपासून मानसिक तणावात होता. रात्री त्याने बाथरूममध्ये कोंडून घेतले. मोठा आवाज आल्यानंतर दरवाजा तोडून त्याला बाहेर काढले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. रॅगिंगचा हा प्रकार नाही. - डॉ. मृणाल पाटील, अधिष्ठाता

बातम्या आणखी आहेत...