आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेऱ्या बंद:तोट्यातील फेऱ्या बंद न करताच 12 नवीन बस वाढवण्याचा घाट ; सिटी लिंकची भूमिका संशयास्पद

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन बस सुरू झाली की प्रतिदिन किमान दोनशे किलोमीटर याप्रमाणे प्रवासी मिळो ना मिळो सिटी लिंककडून भाडे सुरू होणार असल्याच्या विचित्र कराराचा फायदा घेत येत्या सोमवारपासून ७ मार्गांवर नव्याने १२ बसेस सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. मुळात यापूर्वीच पालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी सर्वप्रथम तोट्यातील फेऱ्यांचा अभ्यास करून त्या बंद करून तेथील बसेस जेथे प्रवाशांची मागणी आहे तेथे वळवण्याचे आदेश दिले असताना त्या दृष्टीने कारवाई झालेली नाही. ठेकेदाराचे चांगभले करण्यासाठी बसेसची संख्या वाढवली जात असल्याचा संशय वाढत असून त्यामुळे वाढणाऱ्या तोट्याचा महापालिकेच्या तिजोरीला फटका बसणार आहे. दरम्यान, आयुक्त पवार यांनी गरज तपासून येत्या सोमवारी नवीन बसेस वाढवण्याचा निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले. महापालिकेत भाजपची सत्ता असताना तत्कालीन दत्तक पिता देवेंद्र फडणवीस यांच्या आग्रहामुळे राज्य परिवहन महामंडळाची तोट्यातील बससेवा नाशिक महापालिकेच्या माथी मारली गेली. मात्र आरंभापासून बंद होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या अर्थातच बीएस-४ या बसेस खरेदी वादात सापडली होती. मात्र बससेवेत भाजप-शिवसेना व कालांतराने राष्ट्रवादीलाही रस वाटू लागल्यामुळे सिटी लिंक कार्यान्वित झाली. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट तत्त्वावर खासगी ऑपरेटर्सच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात २५० बसेस चालविण्याचा निर्णय घेतला असून यात २०० बसेस सीएनजी तर, ५० बसेस डिझेल तर १५० इलेक्ट्रिक बस केंद्र शासनाच्या अनुदानातून मिळणार होत्या. यातील २०० बसेस सीएनजी तर, ५० बसेस डिझेल खासगी ठेकेदारामार्फत सुरू करण्यासाठी आदेश देण्यात आले. मात्र कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत ८ जुलै २०२१ रोजी पहिल्या टप्यात ५० बस सुरू केल्या. त्यानंतर बस वाढवण्याचा सपाटा सुरूच राहिला. सद्यस्थितीत शहरातील ५० मार्गावर २०५ बसेस धावत आहेत. तर दैनंदिन प्रवाशांची संख्याही ६५ हजारांवर पोहचली आहे. अद्यापही अनेक मार्गावरील बसेस कमी क्षमतेने धावत असल्यामुळे तोटा वाढत आहे. ही बाब लक्षात घेत सिटी लिंकच्या गेल्या बैठकीत विद्यमान आयुक्त पवार यांनी तोट्यातील बस कोणत्या याची माहिती मागवली होती. जेणेकरून, या मार्गांवरील बसेसच्या फेऱ्या कमी करून ज्या भागात अधिक मागणी आहे तेथे वळवण्याचे नियोजन होते. त्यानुसार आवश्यक माहिती देण्यापूर्वीच शाळा व महाविद्यालये सुरू होणार असल्याचे कारण देत नवीन बारा बसेस सुरू करण्याचा घाट घातला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...