आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिक:जीआय मानांकनामुळे नाशिकच्या वाइनची होणार जगभर ओ‌ळख, उद्योग क्षेत्राबरोबरच पर्यटनाच्या विकासाला मिळणार चालना

नाशिक / सचिन वाघ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाटलीप्रमाणेच आता टीन पॅकमध्येही वाइन उपलब्ध

वर्षाकाठी सुमारे दीड ते पावणेदोन कोटी लिटर वाइन निर्मिती करणाऱ्या नाशिक जिल्ह्याला केंद्र सरकारने जीआय (भौगोलिक मानांकन) बहाल केल्याने नाशिकच्या वाइनची ओळख आता जगभर होणार आहे. वाइन उद्योजकांचा विश्वास यामुळे वाढला असून जागतिक पातळीवर येथील वाइनची गुणवत्ता टिकण्याची त्यांची जबाबदारीही वाढली आहे. वाइन कॅपिटल म्हणून अधिकृत ओळख निर्माण झाल्याने आता धार्मिक, उद्योग क्षेत्राबरोबरच पर्यटन क्षेत्र म्हणूनही जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. जिल्ह्यात खाण्याच्या द्राक्षांप्रमाणेच वाइन निर्मितीच्या द्राक्षांनाही अनुकूल वातावरण असल्याने वीस वर्षांपूर्वी वाइन निर्मितीचा प्रयोग करण्यात आला होता. तो यशस्वी झाल्यानंतर राज्य शासनाने द्राक्ष उत्पादक, वाइन उद्योजक आणि जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार प्राप्तीसाठी वाइन निर्मितीला चालना दिली. एक-दोन नव्हे, तर तब्बल ५२ वाइनरी सुरू झाल्या.

यामध्ये काही वायनरीजने देशासह जगातील विविध देशांत नाशिकच्या वाइनला पोहोचवले. फ्रान्स, इटली, स्पेन, अमेरिकेमध्ये ज्या प्रकारची वाइन तयार केली जाते त्याच पद्धतीने रेड, व्हाइट, स्पार्कलिंग आणि रोझे या प्रकारची वाइन येथे तयार केली जाते. परदेशी ग्राहकांना सहजपणे वाइन उपलब्ध होत असल्याने जिल्ह्यात परदेशी नागरिकांचा राबता वाढला आहे. मुंबई, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद व पुणे आदी शहरांतील वाइनप्रेमी खासकरून नाशिकच्या वाइनची चव घेण्यासाठी येथे येत असल्याने पर्यटनवाढीला चालना मिळत आहे.

जीआय मानांकन म्हणजे काय? एखाद्या विशिष्ट भागामधून एखादा खास पदार्थ किंवा एखादे उत्पादन आलेले असेल आणि तो पदार्थ किंवा उत्पादन त्या भागाची ओळख असेल तर त्याला भौगोलिक मानांकन कायद्याअंतर्गत बौद्धिक संपदेचा दर्जा दिला जातो.

बाटलीप्रमाणेच आता टीन पॅकमध्येही वाइन उपलब्ध
दर्जा व चव टिकून राहण्यासाठी विशिष्ट झाकणाच्या बाटलीमध्ये वाइन उपलब्ध होते. आता तर खास पद्धतीने तयार केलेल्या टीनमधूनही ती उपलब्ध होऊ लागली आहे. विविध झाडांपासून तयार नैसर्गिक रंगांच्या वाइनलाही मागणी वाढली आहे. नाशिकच्या वाइनला देशभरात पोहोचवायचे असेल तर फक्त सरकारने संपूर्ण देशात एक नोंदणीकृत परवाना द्यावा. - शिवाजी आहेर, अध्यक्ष, रेनिसन्स वायनरी
सुला वायनरी, नाशिक

- एकूण वाइनरी : ५२ - सुरू असलेल्या लहान-मोठ्या वाईनरी : २७ - वाइन ग्रेप्सची लागवड क्षेत्र : १४०० एकर - वाइन ग्रेप्ससोबत आता जिल्ह्यातील थाॅम्सन, नानासाहेब परपर या द्राक्षांचाही वाइन निर्मितीसाठी वापर - मुंबईत वाइनची सर्वाधिक होते विक्री, तरुण- तरुणींची रेड आणि व्हाइट वाइनला पसंती - मुंबई, बंगळुुरू, पुणे, दिल्ली, सुरत, पुणे, औरंगाबाद, नागपूर, भोपाळ, इंदूर येथील तरुणांची वाइनला पसंती

बातम्या आणखी आहेत...