आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गिरीश महाजनांचा गौप्यस्फोट:एकनाथ खडसे मला, फडणवीसांना म्हणाले, 'आपण बसून विषय मिटवून टाकू'; माझ्याकडे ऑडिओ क्लिप

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याबद्दल दोन मोठे गौप्यस्फोट केले आहेत. 'आपण बसून विषय मिटवून टाकू', असे खडसे मला आणि फडणवीसांना म्हणाले, असे गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.

तसेच, एकनाथ खडसे व त्यांची सून रक्षा खडसे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते. अमित शहांच्या कार्यालयाबाहेर 3 तास बसूनही त्यांना शहांनी भेट दिली नाही, असा दावाही गिरीश महाजनांनी केला आहे

माझ्याकडे ऑडिओ क्लिप

गिरीश महाजनांच्या या दाव्याचे एकनाथ खडसे यांनी खंडण केले आहे. आपण गिरीश महाजनांशी बोललोच नाही, असे खडसे म्हणाले आहे. त्यावर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर देत म्हटले आहे की, खडसे माझ्याशी आणि फडणवीसांशी काय बोलले, याची ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहे. जास्त बोलायला लावू नका, असा इशाराही गिरीश महाजनांनी दिला.

खडसेच आमच्याजवळ आले

नाशिकमध्ये नुकताच महानुभव पंथाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमात एकनाथ खडसे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, कार्यक्रमातील भाषणे संपल्यानंतर एकनाथ खडसे हे मी आणि फडणवीस जेथे बसलो होतो, तेथे आले. 'आपण बसवून एक विषय मिटवून टाकू', असे ते म्हणाले.

'तो' विषय कोणता?

नेमका 'तो' विषय कोणता? या पत्रकारांच्या प्रश्नावर गिरीश महाजन म्हणाले, कार्यक्रमात गर्दी फार होती. त्यामुळे ते नेमके कोणत्या विषयाबाबत बोलत होते, त्यांच्या मनात कोणता विषय होता, हे काही कळले नाही. तसेच, कार्यक्रमातील गर्दीमुळे तो विषय कोणता, हे मीही त्यांना विचारले नाही.

पुन्हा भाजप प्रवेशाची चर्चा

गिरीश महाजनांच्या या गौप्यस्फोटावर अद्याप एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, यामुळे खडसे यांच्या मनामध्ये चाललंय काय? पुन्हा भाजपमध्ये जाण्यास खडसे उत्सुक आहेत का?, अशी चर्चा पुन्हा राज्याच्या राजकारणात रंगली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे हे आपली सून खासदार रक्षा खडसे यांच्यासह अमित शहांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते. मात्र, भेट न झाल्याने त्यांनी फोनवरच अमित शहांसोबत चर्चा केली होती. यावरही गिरीश महाजनांनी मोठा दावा केला आहे.

अमित शहांनी वेळच दिली नाही

गिरीश महाजन म्हणाले, एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे हे अमित शहांच्या कार्यालयाबाहेर बसल्याचे मलाही कळले होते. तेव्हा रक्षा खडसे यांच्याशी फोनवर बोलणे झाले. बऱ्याच वेळापासून इथे बसून आहोत. आता तीन सात बसून आहोत, तरीही भेट झाली नाही, असे रक्षा खडसेंनीच मला सांगितले होते. अमित शहांच्या कार्यालयाबाहेर तीन तास बसूनही शहांनी खडसेंना भेट दिली नाही, असे गिरीश महाजन म्हणाले,

वंदे मातरम म्हणायला लाज वाटायला नको

राज्य सरकारने 1 ऑक्टोबरपासून 'हॅलो ऐवजी वंदे मातरम' अभियानाला सुरुवात केली आहे. यावर गिरीश महाजन म्हणाले, वंदे मातरम म्हणायला कुणालाही लाज वाटायला नको. वंदे मातरम नारा देत हजारोंनी देशासाठी बलिदान दिले आहे. त्यामुळे वंदे मातरम म्हणण्यामध्ये कुणाच्याही मनामध्ये दुमत असता कामा नये, असेही मंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...