आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:ईपीएफ 95 पेन्शनर्सना महागाई भत्ता, 9 हजार रुपये पेन्शन द्या ; 29 रोजी मोर्चा, केंद्रीय मंत्री डॉ. पवारांच्या कार्यालयावर आंदोलनाचा इशारा

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ईपीएफ ९५ पेन्शनर्सला जगण्यासाठी महागाई भत्त्यासह नऊ हजार रुपये पेन्शन द्यावी यासह अन्य मागण्यांसाठी २९ मार्च रोजीच्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन परिषदेत करण्यात आले. न्याय व हक्कासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह भाजपच्या सर्व केंद्रीय मंत्र्यांच्या संपर्क कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय हक्क परिषदेत घेण्यात आला. या निर्णयास उपस्थित सर्वानी हात वर करून सहमती दिली.

नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशन वतीने ईपीएफ (९५) पेन्शनर्स हक्क परिषदेचे आयोजन प. सा. नाट्यमंदिरात करण्यात आले होते. नाशिक जिल्हा ईपीएफ (९५) पेन्शनर्स फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यातील १८६ सेक्टरमधील सर्व निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कार्यरत असलेल्या संघटना एकत्र आल्या होत्या. गेल्या १० वर्षांपासून सर्व संघटनांनी सुरू केलेला हा लढा अति तीव्र करण्यासाठी ईपीएफ (९५) पेन्शनर्स हक्क परिषदेचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी पेन्शन देण्याबाबत केंद्र सरकारकडून होत असलेल्या दिरंगाईचा निषेध करण्यात आला. पेन्शनर्स चळवळ नेते दिवंगत सुधाकर गुजराथी, नारायण आडणे, रत्नाकर दुगजे, लक्ष्मण काळे, सदानंद जोशी यांना अभिवादन करून त्यांना मरणोत्तर गौरविण्यात आले.

त्यांच्या कुटुंबियांनी गौरवपत्र, शाल स्वीकारले. पेन्शनरांच्या काही तक्रारी अथवा अडचणी असल्यास लेखी स्वरूपात फेडरेशनकडे द्याव्यात. त्याची योग्य ती दखल घेण्यात येईल, असे प्रतिपादन पीएफ कमिशनर अनिलकुमार प्रीतम यांनी केले. यावेळी कोल्हापूरचे अतुल दिघे, एस. टी. सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्रीराम गलेवाड, पेन्शनर हक्क परिषदेचे कार्यक्रम अध्यक्ष तथा नाशिक जिल्हा ईपीएफ (९५) पेन्शनर्स फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले आदी उपस्थित होते. याप्रसंगी “लढा ईपीएफ ९५ पेन्शनर्स’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राजू देसले, चेतन पणेर, सुभाष काकड, प्रकाश नाईक, श्रीकांत साळसकर, शिवाजी ढोबळे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...