आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष:अंदरसूलला साकारतोय गोबरधन प्रकल्प, 50 लाखांची तरतूद, स्वयंपाकासाठी स्वच्छ व स्वस्त बायोगॅस पुरवठा करणे हेच उद्दिष्ट

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत केंद्र शासनाच्या वतीने गोबरधन योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत येवला तालुक्यातील अंदरसूलची निवड करण्यात आली अाहे. सार्वजनिक स्तरावर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिली. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रकल्प असून सहा महिन्यात प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी शासनाकडून ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनासह स्वच्छतेच्या विविध घटकांवर काम करण्यात येत आहे. प्रायोगिक तत्त्वावर प्रत्येक जिल्ह्यात एका गावात गोबरधन प्रकल्प राबविण्याचे निर्देश आहेत. या योजनेत प्रामुख्याने शेती कचरा, सेंद्रिय कचरा, गुरांचा कचरा, गोशाळेपासून घरगुती वापर गॅसची निर्मिती करण्यात येणार आहे. या गॅसचा वापर गावातील कुटुंब, शाळा, अंगणवाडीत करण्यात येणार अाहे. स्लरीचा उपयोग शेतीसाठी खत म्हणून करण्यात येणार आहे. जनावरांची संख्या, लोकसंख्या, शेतीत निर्माण होणारा कचरा या निकषावर या प्रकल्पासाठी अंदरसूल गावाची निवड करण्यात आली. राज्यस्तरावरून नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक संस्थेकडून गावाचे सर्वेक्षण, आराखडा, अंदाजपत्रकाचे काम पूर्ण करण्यात आले. यानंतर इ टेंडर करण्यात आले होते. यात पात्र ठरलेल्या संस्थेला २४ ऑगस्ट २०२२ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी गुरांचा कचरा, स्वयंपाकघरातील कचरा, पिकांचे अवशेष आणि बाजारातील कचऱ्यासह जैव कचऱ्याचे रूपांतर करून गाव स्वच्छतेसाठी गोबरधन योजना राबविण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आणि कुटुंबांना आर्थिक आणि संसाधन फायदे देण्याचे उद्दिष्ट आहे. खेड्यांत चांगली स्वच्छता आणि आरोग्य याद्वारे या योजनेचा फायदा ग्रामीण भागातील महिलांना होणार अाहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे काम हाेत असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी दिली.

गोबरधन योजनेचे उद्दिष्ट घनकचरा व्यवस्थापन, ग्रामीण भागातील जनतेचे उत्पन्न व रोजगार वाढविणे आणि पर्यावरणावरील दुष्परिणाम कमी करणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. गावातील कचरा कमी करून, गावाच्या स्वच्छतेचा स्तर उंचावणे, सेंद्रिय खतापासून बायोगॅस प्रकल्पातील शिल्लक स्लरीचा उच्च दर्जाचे खत रासायनिक खताला पर्याय उपलब्ध करून देणे, साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावून, मलेरिया व अस्वच्छतेपासून निर्माण होणाऱ्या रोगांचे निर्मूलन करणे, स्वयंपाकासाठी स्वच्छ व स्वस्त बायोगॅस पुरवठा करणे.

बातम्या आणखी आहेत...