आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभेनंतर लक्षवेधी ठरलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणातील ११ उमेदवारांमध्ये दीडशे कोटींच्या उद्योजकांसह दीड कोटीचे मालक असलेल्या नवोदितांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गेल्या ६ वर्षांत भाजपच्या उमेदवारांची मालमत्ता वाढली, तर काँग्रेसच्या उमेदवारांच्या घटली. सर्व उमेदवारांच्या मालमत्तेतील सरासरी वाढ १४३ टक्क्यांच्या पुढे जाते. दुसरीकडे, राज्याच्या दरडोई उत्पन्नात गेल्या ८ वर्षांत ७९%, सोन्याच्या दरात ८८%, तर सेन्सेक्स १११% वधारला. मात्र, सत्ता असो वा नसो, राजकारण्यांच्या संपत्तीत याच काळात ४९३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली. विधान परिषद निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आपल्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्राचे विश्लेषण केले असताना उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चल-अचल मालमत्तांत लक्षणीय वाढ झाल्याचे समोर आले.
कोटीच्या कोटी उड्डाणे
२०१३-१४ मध्ये राज्याचे दरडोई उत्पन्न १,२५,२६१ रुपये होते. २०२२ मध्ये ते २,२५,०७३ झाले. ८ वर्षांत यात ७९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. २०१३ मध्ये दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर २८००६ रुपये होता. जून २०२२ मध्ये हा दर ५२,८६५ रुपयांवर पोहोचला आहे. ही वाढ ८८ टक्के आहे. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स २०१४ मध्ये २५,००० अंकांवर होता. २०२२ मध्ये तो ५२,८४७ वर पोहोचला. ८ वर्षात त्यात १११ टक्क्यांची वाढ झाली. या तुलनेत विधान परिषदेच्या उमेदवारांच्या मालमत्तेत मोठी वाढ झाली आहे.
भाजप : राम शिंदेंची संपत्ती ६ लाखांहून ४.२७ कोटींवर, लाड १५२ कोटींचे धनी
उद्योजक आणि ८ कंपन्यांचे संचालक तथा भाजप उमेदवार प्रसाद लाड यांची संपत्ती २०१६ मधील १२६ कोटींवरून १५२ कोटींवर गेली. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची संपत्ती ६ वर्षांत ५७% वाढली. गतवेळी त्यांच्याकडे ४ कोटींची संपत्ती होती, आता ती ७ कोटी झाली आहे. प्रथमच विधान परिषदेच्या रिंगणात असलेल्या राम शिंदेंनी २००९ मध्ये ६ लाखांची संपत्ती दाखवली होती. या वेळी त्यांनी ४ कोटी २७ लाख संपत्ती दाखवली आहे. ही वाढ ४९३% आहे.
राष्ट्रवादी : खडसे ३३ कोटींचे मालक, शिवसेना : अहिरांकडे ३६ कोटी रुपये
एकनाथ खडसे यांनी ३३ कोटींच्या संपत्तीचे विवरण दिले आहे. २००४ मध्ये त्यांची संपत्ती २ कोटी होती, २०१९ मध्ये ती १७ कोटी, आता ३३ कोटींवर गेली. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि नंतर शिवसेनेत गेलेले व सध्या शिवसेनेच्या वतीने विधान परिषदेच्या रिंगणात असलेले सचिन अहिर यांच्या संपत्तीतही दुपटीने वाढ झाली आहे. मागील वेळी त्यांनी १७ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली होती. या वेळी ३६ कोटींच्या मालमत्तेचा तपशील दिला आहे.
काँग्रेस : भाई जगताप यांची संपत्ती ३८ कोटींनी, तर हंडोरेंची ४ टक्क्यांनी घटली
भाजपच्या उमेदवारांची आर्थिक प्रगती वेगाने होत असताना काँग्रेसच्या उमेदवारांच्या संपत्तीत मात्र घट झाल्याचे दिसते. विधान परिषदेचे माजी आमदार, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व विद्यमान उमेदवार भाई जगताप यांची मागील निवडणुकीत ८७ कोटींची संपत्ती दाखवली होती. यावेळी ४९ कोटींची संपत्ती दाखविली आहे. माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्याही संपत्तीत चार टक्क्यांची घट झाली आहे.
अहिर, खडसेंकडे वाहने नाहीत, भाईंकडे ३ मर्सिडीज
भाई जगताप ३ मर्सिडीजसह ४ कार्सचे मालक आहेत. त्यांच्या नावे ९६.३३ लाख, तर पत्नीच्या नावावर २७.२६ लाख आणि ५६ लाखांच्या २ मर्सिडीज आहेत. भाईंच्या नावावर २६.९४ लाखाची एक इनोव्हासुद्धा आहे. आमशा पडवी यांच्या घरात ७ वाहने आहेत. त्यांच्या नावावर टाटा सफारी, बोलेरो, इको मारुती, अशोक लेलँड व टाटा ९०९ आहे. त्यांच्या पत्नीच्या नावावर टाटा सुमो आणि ट्रॅक्टर आहे. हंडोरेकडे १४ लाखांची टॅरेनो आणि पत्नीकडे २६ लाखांची इनोव्हा क्रेस्टा आहे. खडसेंकडे एकही वाहन नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.