आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Local
 • Maharashtra
 • Nashik
 • ST Workers Strick | Mumbai | Govt Forgets Promises Made To ST Workers In Manifesto; Transport Minister Parab Says Public Discussion Is Not Appropriate

आश्वासन हवेत:जाहीरनाम्यात एसटी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा आघाडी सरकारला विसर; परिवहनमंत्री परब म्हणतात, सार्वजनिक चर्चा योग्य नाही

सचिन जैन | नाशिक,मुंबई13 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे यासाठी तीन आठवड्यांपासून संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दरबारी पोहोचला. संपावर तोडगा निघत नसल्याने पवारांनीच सोमवारी (२२ नोव्हेंबर) पुढाकार घेत परिवहनमंत्री अनिल परब यांच्यासह विभागातील अधिकाऱ्यांना पाचारण केले. या वेळी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासह विविध पर्यायांवर चर्चा झाली.

मात्र, संपाची कोंडी फोडताना आघाडी सरकारला, विशेषत: काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांचा सोयीस्कर विसर पडल्याचे दिसत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊ, असे आश्वासन काँग्रेस-राष्ट्रवादीने आपल्या संयुक्त जाहीरनाम्यात दिले होते. आता मात्र मंत्री परब म्हणतात, पगारवाढीची सार्वजनिकरीत्या चर्चा करणे योग्य नाही.

विधानसभेपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करा, अशी मागणी एसटी कामगार संघटनेने महाविकास आघाडी सरकारमधील सर्व घटक पक्षांच्या नेत्याना लेखी पत्राद्वारे करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याच्या भावना कर्मचाऱ्यांमध्ये आहेत. विशेष म्हणजे आता शासनात विलीनीकरणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच अधिक विरोध असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, याबाबत तिन्ही पक्षांच्या जाहीरनामा समित्यांमधील सदस्यांशी ‘दिव्य मराठी’ ने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भाष्य करणे टाळले.

विलीनीकरणाचा मुद्दा न्यायालयावर सोडला

विलीनीकरणाचा मुद्दा हा उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीसमोर आहे. समिती जो अहवाल देईल तो आम्ही स्वीकारू. विलीनीकरण असो की खासगीकरण अथवा पगारवाढ, यावर सार्वजनिक चर्चा करणे योग्य नाही. राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल. मध्यममार्ग काढायला हवा. महामंडळ तोट्यात असल्याने संप लवकरात लवकर मागे घेण्यातच हित असल्याचा दावा परब यांनी केला.

 • राज्यात ३६ मार्गांवर सोमवारी केवळ १६१ बस धावल्या. त्यातून ३ हजार ९२८ प्रवाशांनी प्रवास केला.
 • एसटी महामंडळाचे एकूण ६ हजार ९४३ कर्मचारी कामावर हजर होते. त्यामध्ये २७८ चालक असून १६५ वाहक होते.
 • २४ तासांत कामावर हजर न राहिल्याने ५२६ रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त केल्या.
 • एसटीचा संप शरद पवारांच्या दरबारी, तरीही तोडगा नाहीच

सोमवारी सकाळी शरद पवार यांनी परिवहनमंत्री परब यांच्यासह परिवहन विभागातील अधिकाऱ्यांना बैठकीसाठी पाचारण केले. वरळीतील नेहरू सेंटरमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर परब यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या मागण्या व समस्या, महामंडळाच्या अडचणी समजून घेण्यासाठी पवारांनी माझ्यासह अधिकाऱ्यांना बोलावले होते. त्यांनी आमच्याकडून परिस्थिती समजून घेतली. तसेच विविध पर्यायांवर चर्चा करून मार्ग कसा निघू शकतो यावर मंथन झाले.

महामंडळाला रुळावर आणण्यासाठी व उत्पन्न वाढवण्यासाठी काय करावे लागेल यावर प्रामुख्याने चर्चा झाली. सोबतच, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनप्रश्नी इतर राज्यात काय स्थिती आहे, तेथील कर्मचाऱ्यांना किती वेतन दिले जाते याचाही आढावा घेण्यात आला. काही राज्यांत काही प्रमाणात खासगीकरण केले आहे. त्याचे मॉडेल पवारांनी समजून घेतल्याचे परब म्हणाले.

राष्ट्रवादी व काँग्रेसने दिलेली आश्वासने
एसटी महामंडळाचे अत्याधुनिकीकरण करणार
{महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सक्षम परिवहन सेवा उभी करण्यासाठी शासनातर्फे अनुदान उपलब्ध करून देणार. तसेच प्रवाशांच्या साेयीसाठी नवीन बसेस उपलब्ध करून आधुनिकीकरण करणार.
एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व वेतन व भत्ते देणार
महामार्गालगत वाहतुकीस अडथळा हाेणार नाही या पधद्धतीने बसथांबे उभारणार, ग्रामीण भागातील एसटी थांब्याची संख्या वाढविणार व त्यांची नियमित स्वच्छता ठेवणार

शिवसेनेचा वचननामा

 • विद्यार्थ्यांसाठी २४०० स्वतंत्र बसेस - ‘विद्यार्थी एक्स्प्रेस’ सुरू करणार.
 • एसटीच्या माध्यमातून शहर बससेवा सक्षम करणार.

आश्वासनांची आठवण सर्व नेत्यांना करून दिली :

गतवर्षी म्हणजे डिसेंबर २० मध्येच लेखी पत्रांद्वारे आम्ही आश्वासनांची आठवण सर्व पक्षांच्या नेत्यांना करून दिली. मात्र, त्याचीही पूर्तता होत नसल्याने कामगारांमध्ये संताप आहे. - मुकेश तिगोटे, सरचिटणीस, इंटक एसटी कर्मचारी संघटना

बातम्या आणखी आहेत...