आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिफाड तालुक्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यात पाहणी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने एकरी १ लाख नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. निफाड तालुक्यातील चांदोरी येथे दानवे यांनी आज (१२ एप्रिल) दुपारी बाळासाहेब आहेर या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या नुकसानग्रस्त द्राक्षबागेची पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते.
या वेळी आपली व्यथा मांडताना शेतकरी म्हणाले की, अवकाळी व गारांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरता कोलमडला आहे. लाखो रुपये खर्च होऊनही अस्मानी संकटाने सर्वकाही हिरावून नेले. शासनाकङून आम्हाला उभं राहण्यासाठी मदतीची गरज आहे.
या वेळी चांदोरी येथील कांदा उत्पादक सोमनाथ सोनवणे यांच्या कांद्याची पाहणी केली. तसेच उपस्थित शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांनी द्राक्षबागेसह कांदा, गहू व भाजीपाला या पिकांचीही पाहणी करत सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. ते म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये प्रतिक्विंटल अनुदान देऊन थट्टा केली आहे. राज्यात सर्वत्र अवकाळीने शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले आहे, तरीही शिंदे सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणे-घेणे नसून डिसेंबरमध्ये जाहीर केलेली मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नसल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.