आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नमामि गोदा’:1823 कोटी रुपयांच्या निधीतून गोदा प्रदूषणमुक्ततेची गुढी; नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरी प्रदूषणमुक्ती

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासनाने प्रमुख नद्यांना प्रदूषणाचा समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीसाठी ‘नमामि गोदे’साठी १८२३ कोटी रुपयांच्या आराखड्याला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखवला आहे. आता महापालिकेने सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली असून योगायोगाने गेल्याच आठवड्यात आलेले नवीन आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार हे गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी वेगाने पावले उचलत असल्यामुळे यावर्षी गोदावरी प्रदूषणमुक्तीची गुढी उभारली जाण्याची सुखद आशा आहे.

नाशिकचे महत्त्व गोदावरी नदीमुळे आहे. गोदातीरावरच दर १२ वर्षांनी कुंभमेळा भरत असल्याने या नदीला धार्मिक महत्त्वही आहे. प्रभू रामचंद्रांचे वास्तव्यदेखील नाशिकमध्ये राहिल्याने येथे देशभरामधून भाविक तसेच पर्यटक विविध धार्मिक विधी तसेच देवदर्शनासाठी गर्दी करतात. दर्शनापूर्वी गोदास्नानाला प्रचंड महत्त्व आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांत औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधून नदीपात्रात सोडण्यात येत असलेले रासायनिक सांडपाणी, मलवाहिका आणि भूमिगत गटारींचे जाळे, पर्यावरणाच्या निकषात कालबाह्य ठरलेले मनपाचे मलनिस्सारण प्रकल्प यामुळे गोदावरी नदी प्रदूषित झाली आहे. अलिकडेच राष्ट्रीय हरित लवादाने गोदावरीचे आंघोळीसाठीही अयोग्य असल्याचा ठपका ठेवला.

ही बाब लक्षात घेत तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी यांनी ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर नाशकातही गोदावरी व तिच्या उपनद्यांच्या प्रदूषणमुक्ती तसेच कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर घाट विकासासाठी ‘नमामि गोदा’ प्रकल्प राबविण्याचा संकल्प केला. केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी महापालिकेच्या या योजनेला तत्त्वत: मान्यता देत सविस्तर प्रकल्प अहवाल राज्य शासनामार्फत सादर करण्याचे निर्देश दिले.

महासभेच्या मंजुरीनंतर १८२३ कोटींचा ‘नमामि गोदा’ प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली गेली. त्यासाठी निविदाही प्रसिद्ध केल्या आहेत. आता सल्लागार नियुक्तीनंतर सल्लागाराने तयार केलेला डीपीआरची छाननी केली जाईल. ही समिती निविदा प्रक्रियेत प्राप्त झालेल्या देकार आणि त्यांच्या कागदपत्रांची छाननी करून अंतिम अहवाल देईल. त्यानंतर हा आराखडा केंद्र शासनाला गेल्यानंतर त्यासाठी निधीची तरतूद होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. नवीन आयुक्त पवार यांनी नमामी गोदावरी प्रकल्प अत्यंत मनावर घेतला असल्यामुळे पुढील प्रक्रिया झटपट झाल्यास नववर्षात गोदा प्रदूषण मुक्तीची गुढी उभारली जाईल.

बातम्या आणखी आहेत...